‘प.पू. डॉक्‍टर’ असा नामजप केल्‍यावर मृत्‍यूच्‍या विळख्‍यातून बाहेर आलेल्‍या अमरावती येथील सोनाली मालोकर !

‘प.पू. डॉक्‍टर’ या नामातील साधिकेने अनुभवलेले सामर्थ्‍य !

(पू.) अशोक पात्रीकर
सौ. सोनाली मालोकर

१. सौ. सोनाली यांना तीव्र शारीरिक आणि आध्‍यात्मिक त्रास असणे अन् त्‍यांना शारीरिक त्रास होत असतांना प्रत्‍येक वेळी रुग्‍णालयात भरती करावे लागणे

‘अमरावती येथील सौ. सोनाली मालोकर यांना तीव्र आध्‍यात्मिक त्रास आहे. त्‍यांना अनेक शारीरिक व्‍याधींना सतत तोंड द्यावे लागते. त्‍यांना शरिरातील रक्‍त अल्‍प होणे, आतड्यांना सूज येणे, छातीत तीव्र वेदना होणे, मूत्राशयात गाठी होणे, असे त्रास एकाच वेळी होत असतात. त्‍यांना त्रास होतांना प्रत्‍येक वेळी रुग्‍णालयात भरती करावे लागते.

२. गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी सौ. सोनाली यांना अनेक शारीरिक त्रास होऊ लागल्‍याने त्‍यांना तातडीने रुग्‍णालयात भरती करावे लागणे, त्‍यांच्‍याकडून औषधोपचाराला अल्‍प प्रतिसाद मिळणे आणि त्‍या केवळ ‘प.पू. डॉक्‍टर’ असा जप करू शकणे

जुलै २०२२ मध्‍ये ऐन गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी सौ. सोनाली यांना अकस्‍मात् एकाच वेळी अनेक शारीरिक त्रास होऊ लागले. त्‍यामुळे त्‍यांना रुग्‍णालयात तातडीने भरती करावे लागले. आधुनिक वैद्यांनी सौ. सोनाली यांच्‍या विविध प्रकारच्‍या चाचण्‍या केल्‍या आणि त्‍यांच्‍यावर औषधोपचार चालू केले; पण त्‍यांच्‍याकडून प्रतिसाद अल्‍प मिळत होता. तेव्‍हा मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सौ. सोनाली यांच्‍यासाठी नामजप विचारला. मी सौ. सोनाली यांना परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या आवाजातील काही मंत्र ऐकायला दिले. सौ. सोनाली यांच्‍याकडून हे काहीच होत नव्‍हते. त्‍या केवळ ‘प.पू. डॉक्‍टर’ असा जप करू शकत होत्‍या. मी त्‍यांचे यजमान श्री. योगेश यांना सौ. सोनाली यांच्‍यासाठी मंत्र म्‍हणायला आणि नामजप करायला सांगितला.

३. आधुनिक वैद्यांनी ‘आमचे सर्व उपाय संपले आणि आता त्‍यांना केवळ ईश्‍वर वाचवू शकेल’, असे सांगणे, सौ. सोनाली ‘प.पू. डॉक्‍टर’ असा जप अखंड करत असणे आणि त्‍यांच्‍या प्रकृतीत सकारात्‍मक पालट होणे

सौ. सोनाली यांना अतीदक्षता विभागात भरती केले असल्‍याने त्‍यांना कुणालाही भेटता येत नव्‍हते. एका रात्री आधुनिक वैद्यांनी श्री. मालोकार यांना सांगितले, ‘‘आमचे सर्व उपाय संपले. आता त्‍यांना केवळ ईश्‍वरच वाचवू शकेल.’’ सौ. सोनाली यांचा ‘प.पू. डॉक्‍टर’ हा जप अखंड चालू होता. काही दिवसांनी आधुनिक वैद्यांना त्‍यांच्‍या प्रकृतीत किंचित् सकारात्‍मक पालट जाणवला; म्‍हणून श्री. योगेश यांनी आधुनिक वैद्यांची अनुमती घेऊन मला रुग्‍णालयात भेटायला बोलावले. मी सौ. सोनाली यांना भेटल्‍यावर माझ्‍या लक्षात आले, ‘सौ. सोनाली यांचा मोठ्या आवाजात ‘प.पू. डॉक्‍टर’ हा जप चालू आहे.’

४. अतीदक्षता विभागात मोठ्या आवाजात बोलण्‍यावर बंधन असतांनाही ‘प.पू. डॉक्‍टर’ हा नामजप मोठ्या आवाजात करण्‍यास सौ. सोनाली यांना अनुमती मिळणे आणि २ आठवड्यांनंतर त्‍यांच्‍या प्रकृतीत सुधारणा होणे

अतीदक्षता विभागात मोठ्या आवाजात बोलण्‍यावर बंधने असतात. तेथील परिचारिका सौ. सोनाली यांना ‘हळू आवाजात बोला’, असे सांगत होत्‍या; पण त्‍या हळू आवाजात बोलू शकत नव्‍हत्‍या. शेवटी परिचारिकांनीही त्‍यांना सांगायचे सोडून दिले. परिचारिका श्री. योगेश यांना विचारायच्‍या, ‘‘या ‘प.पू. डॉक्‍टर’, असे सतत का म्‍हणतात ?’’ तेव्‍हा श्री. योगेश यांनी सांगितले, ‘‘ते आमचे गुरु आहेत. ती त्‍यांच्‍या नावाचा जप करते. तिला येथील आधुनिक वैद्यांविषयीही कृतज्ञता वाटते.’’ हे ऐकल्‍यावर परिचारिकांनाही आश्‍चर्य वाटले आणि सौ. सोनाली रुग्‍णालयात असेपर्यंत त्‍यांना ‘प.पू. डॉक्‍टर’ हा जप करायला अनुमती दिली. त्‍यानंतर २ आठवड्यांनंतर सौ. सोनाली यांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्‍यांना घरी जाण्‍याची अनुमतीही मिळाली.

५. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेनेच आतापर्यंत प्रत्‍येक प्रसंगातून तरून गेले आहे’, अशी श्रद्धा असल्‍याने ‘प.पू. डॉक्‍टर’, असा जप आपोआप झाला’, असे सौ. सोनाली यांनी सांगितल्‍यावर भावजागृती होणे : त्‍यानंतर सौ. सोनाली मला भेटायला अमरावती सेवाकेंद्रात आल्‍या होत्‍या. तेव्‍हा मी त्‍यांना ‘प.पू. डॉक्‍टर’, असा जप करण्‍याचे कारण विचारले. तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेनेच मी यापूर्वी प्रत्‍येक प्रसंगात तरून गेले आहे. त्‍यामुळे या वेळीही तेच तारून नेतील’, अशी माझी श्रद्धा होती; म्‍हणून माझ्‍याकडून असा जप आपोआप होत होता. मला तर काहीच आठवत नाही.’’ त्‍यांचे बोलणे ऐकून ‘प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेमुुळेच सौ. सोनाली मृत्‍यूच्‍या विळख्‍यातून बाहेर आल्‍या’, याची निश्‍चिती होऊन माझी भावजागृती झाली.

६. या सूत्रांचे टंकलेखन करतांना ‘सौ. सोनाली यांनी केलेल्‍या या जपामुळे अतीदक्षता विभागातील कितीतरी रुग्‍णांना लाभ झाला असेल’, असाही विचार माझ्‍या मनात आला आणि माझा पुन्‍हा भाव जागृत झाला.’

– (पू.) अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था (२२.१०.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक