महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस वीरगतीला प्राप्त, १ घायाळ !

मुंबई – महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील सकमा जिल्ह्यात २० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८.३० वाजता नक्षलवाद्यांनी पोलिसांवर आक्रमण केले. या आक्रमणात २ पोलीस वीरगतीला प्राप्त झाले, तर १ पोलीस घायाळ झाला. १० ते १२ नक्षलवाद्यांच्या गटाने हे आक्रमण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. वीरगतीला प्राप्त झालेले पोलीस छत्तीसगड राज्यातील आहेत.


१. छत्तीसगड जिल्ह्यातील बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललित यादव हे पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावरील ढाब्याकडे चहा पिण्यासाठी गेले असता तेथे दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला.


२. आक्रमणानंतर वाहनाला आग लावून नक्षलवाद्यांनी पलायन केले. चहा पिण्यासाठी जातांना पोलिसांनी समवेत बंदुका घेतल्या नव्हत्या. (संवेदनशील असणार्‍या नक्षलवादग्रस्त भागांत कर्तव्य बजावत असतांनाही पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदूक न बाळगणे हे अत्यंत गंभीर आहे ! – संपादक) ही घटना जेथे घडली, तेथून महाराष्ट्राचा तपासनाका ५० मीटर अंतरावर आहे. या आक्रमणानंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला असून पोलिसांनी नक्षलवाद्यांची शोधमोहीम हाती घेतली आहे.