पाकमध्ये तालिबानी आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तुख्वा प्रांतातील तोरखम येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. टीटीपीने गेल्या मासाभरात पोलिसांवर ३ मोठी आक्रमणे केली. यांत इस्लामाबाद, पेशावर आणि २ दिवसांपूर्वी कराची येथील आक्रमणाचा समावेश आहे. यांत आतापर्यंत एकूण ११६ पोलीस ठार झाले आहेत, तर ३ आतंकवादीही मारले गेले आहेत.

टीटीपीने म्हटले होते की, पाकिस्तानच्या प्रत्येक राज्यात पोलीस निरपराध लोकांना कारागृहात टाकतात आणि नंतर त्यांना चकमकीत मारतात. यासाठीच आम्ही पोलिसांचा सूड उगवत आहोत. आम्ही पाकिस्तानच्या पोलिसांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, त्यांनी आमच्या युद्धापासून दूर रहावे. सैन्याचे गुलाम बनू नये. त्यांनी आमच्याविरुद्ध कारवाया चालू ठेवल्या, तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या घरांवर आक्रमणे करत राहू. सुरक्षा यंत्रणांनी हे समजून घेतले पाहिजे की, आता ते निरपराध बंदीवानांना मारू शकत नाहीत. प्रतिदिन बनावट चकमकी होत आहेत. हे थांबले नाही, तर भविष्यात आम्ही आणखी तीव्र आक्रमणे करू.