कवर्धा (छत्तीसगड) – देशभरातील नक्षलवादी संघटनांना राजकीय पक्षांचे समर्थन आहे. नक्षलवाद्यांना राजकीय पक्षांनी राजकीय आश्रय दिला आहे , असे वक्तव्य गोवर्धन पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले. जगदलपूर येथील धर्मसंसदेच्या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, ‘‘सत्तारूढ पक्ष आणि विरोधी यांनी नक्षलवाद्यांना दिलेले समर्थन थांबवले, तर देशात किती नक्षलवादी शेष रहातील ? असे केल्यास नक्षलवाद आपोआप संपुष्टात येईल. सर्व राजकीय पक्ष त्यांना पोसत आहेत.’’
काँग्रेसच्या मंत्र्याकडून शंकराचार्यांच्या वक्तव्याचे समर्थन !
स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे कृषीमंत्री रविंद्र चौबे यांनी समर्थन दिले आहे. ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘‘गोवर्धन पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद हे सनातन धर्माचे प्रमुख आहेत. त्यांच्या वक्तव्याचा आदर करणे आवश्यक आहे. वेगळवेगळ्या प्रांतात नक्षलवादी कारवाया फोफावण्यामागील कारणे वेगवेगळी आहेत. ही समस्या सुटण्यासाठी सर्व राज्यांची बैठकही होत असते. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून नक्षलवादी कारवाया ठराविक क्षेत्रापुरता सीमित झाल्या आहेत. राज्यात नक्षलवाद आता संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहे. अजूनही बिहार, झारखंड आदी राज्यांमध्ये नक्षलवादी कारवाया चालू आहेत. तेथील राजकीय परिस्थितीविषयी मी बोलू इच्छित नाही; मात्र जर राजकीय पक्षांनी नक्षलवाद नष्ट करण्याचे ठरवले, तर तो नष्ट होऊ शकतो. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या भूपेंद्र बघेल सरकारने ४ वर्षांत राज्यातील नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांना आळा घातला.
(जर छत्तीसगडमधील नक्षलवाद संपला आहे, तर तेथे भाजपच्या नेत्याची हत्या का झाली ? शंकराचार्यांच्या वक्तव्याला राजकीय रंग देऊन स्वतःची पाठ थोपटून घेणारे काँग्रेसवाले ! – संपादक) शंकराचार्यांनी केलेल्या वक्तव्यात सत्यता आहे. छत्तीसगडमध्ये मागील १५ वर्षांत भाजपचे डॉ. रमण सिंह यांचे सरकार असतांना त्यांनी नक्षलवादी कारवाया का थांबवल्या नाहीत ? बस्तरमध्ये तर भाजप सत्तेत असतांना नक्षलवादी समांतर सरकार चालवत होते. (काँग्रेस सत्तेत असतांना भारतातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी तिने का प्रयत्न केले नाहीत ?, याचे उत्तरही चौबे यांनी दिले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाही स्थिती लोकशाहीचा दारूण पराभव करणारी आहे, असेच सर्वसामान्यांना वाटेल ! |