१. सहनशीलता
१ अ. शांत आणि स्थिर स्वभाव : ‘सर्वांत पहिल्यांदा मी जेव्हा ‘रुग्ण’ म्हणून पू. खेरआजींना पहाण्यास गेलो, तेव्हा त्यांचा रक्तदाब पुष्कळ अधिक होता. (सर्वसामान्यतः व्यक्तीचा रक्तदाब १२०/८० mm of Hg एवढा असतो; पण पू. आजींचा रक्तदाब १८०/९० mm of Hg एवढा होता.) असे असूनही त्या स्थिर आणि शांत होत्या. नंतर मी त्यांचे गोळ्यांचे प्रमाण वाढवल्यावर त्यांचा रक्तदाब सामान्य (प्राकृत) झाला.
१ आ. ‘एस्.टी.’तून प्रवास करतांना पू. आजींच्या कंबरेला मार बसणे : पू. आजींची सून सौ. मीनल खेर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी सांगितले, ‘‘काही वर्षांपूर्वी पू. आजी ‘एस्.टी.’च्या मागील आसंदीवर बसून प्रवास करत होत्या. तेव्हा ‘एस.टी.’ एका खड्ड्यातून वेगाने गेली आणि मागे बसलेल्या आजी आसंदीवर जोरात आदळल्या. त्यामुळे त्यांच्या कंबरेला मार बसला. नंतरचे अनेक मास त्या लाकडी पट्टीच्या खाटेवर गादीविना झोपून रहायच्या.
१ इ. पू. आजींच्या चेहर्यावर वेदना किंवा दुःख न दिसणे : मागील वर्षी पू. आजींचा तोल जाऊन त्या हलकेच खाली पडल्या. तेव्हा त्यांचा डावा पाय दुखावला होता आणि त्या पायावर जराही भार देता येत नव्हता. असे असूनही पू. आजींच्या मुखावर कधीही वेदना किंवा दुःख दिसत नसे. एकूणच पू. आजींची प्रकृती सर्व त्रास सहन करण्याची होती.
१ ई. तितिक्षा – दुःख सहन करत रहाणे : पू. आजी ‘संत’ म्हणून घोषित झाल्यानंतर मला त्यांच्या अनेक गुणांचा परिचय झाला. त्यापैकी विशेष लक्षात रहाणारा त्यांचा गुण म्हणजे ‘तितिक्षा !’ पू. शंकराचार्यांनी सांगितले आहे,
सहनं सर्वदुःखानामप्रतीकारपूर्वकम् ।
चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते ॥ – विवेकचूडामणि, श्लोक २४
अर्थ : दुःखांचा प्रतिकार न करता आणि दुःखासाठी शोक अन् विलाप न करता ते सहन करणे, म्हणजे तितिक्षा !
स्पष्टीकरण : प्रतिकार न करता आणि दुःख दूर होण्यासाठी कुठलाही उपाय न करता ते सतत सहन करायचे. दुःख सहन करत असतांना चिंता करायची नाही किंवा ‘माझ्याच वाट्याला हे दुःख का आले ?’, असा विचारही मनात येऊ द्यायचा नाही. या गुणाला ‘तितिक्षा’, असे म्हणतात.
२. पू. आजींनी उपचारांना प्रतिसाद दिल्यामुळे आत्मविश्वास निर्माण होणे
कोणत्याही वैद्यांना नेहमी ऐकणारे आणि उपचारांना (चिकित्सेला) त्वरित प्रतिसाद देणारे रुग्ण आवडतात. कोरोना महामारी येण्याआधी किमान एक वर्षभर पू. आजींचे चालणे न्यून झाले होते. त्यामुळे ‘त्या आता अंथरूण धरणार (आजारी पडणार)’, असे सर्वांना वाटत होते. मी त्यांना नियमित बस्ती (आयुर्वेदातील पंचकर्माच्या अंतर्गत एक उपचार) दिल्यावर पू. आजी घरात व्यवस्थित चालू लागल्या. त्यामुळे ‘पू. आजींवर मी आत्मविश्वासपूर्वक उपचार करू शकतो’, असा विश्वास त्यांनी माझ्या मनात निर्माण केला.
३. पू. आजींनी आस्थेने वैद्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे आणि त्या वेळी ‘स्वतः वैद्य आहे’, हा अहंकार दूर होणे
कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यानंतर अनेक वेळा मला पू. आजींची आठवण यायची आणि त्याच दिवशी सौ. मीनल खेरवहिनींकडून मला निरोप यायचा, ‘पू. आजींनी तुमची आठवण काढली आहे. वेळ असेल, तेव्हा घरी येऊन जाल का ?’ मी त्यांच्या घरी गेल्यावर पू. आजी आस्थेने माझी विचारपूस करायच्या आणि ‘‘तुमची प्रकृती ठीक आहे ना ?’’, असे विचारायच्या. तेव्हा पू. आजी माझ्या प्रकृतीची विचारपूस करत असल्याने ‘मी वैद्य आहे’, हा माझा अहंकार दूर व्हायचा.
४. मार्च २०२२ मध्ये पू. आजींची प्रकृती खालावल्यावर ‘त्या देह ठेवणार’, असे सर्वांना वाटणे, वैद्यांनी पू. आजींना स्पष्टपणे त्याविषयी विचारल्यावर त्यांनी ‘एवढ्यात देह ठेवणार नाही’, असे सांगणे
पू. आजींच्या घरी जायचे म्हटले की, ‘आज कुठलीतरी नवीन छान अनुभूती येईल’, असे मला वाटायचे. गेल्या वर्षीची अनुभूती म्हणजे मार्च २०२२ मध्ये आजींची प्रकृती खालावली. त्यामुळे सर्वांना वाटायला लागले की, पू. आजींचे आयुष्य संपत आले आहे. मला मात्र असे वाटत होते, ‘पू. आजी संत आहेत आणि संताचे सर्व जीवन त्यांच्या प्रकृतीला धरून असते. माणसाची प्रकृती त्याच्याकडे असणार्या बळावरच अवलंबून असते. बळ चांगले असेल, तर माणसाचा वर्ण (रंग) आणि स्वर (वाणी) चांगले असतात.
मार्च २०२२ मध्ये मला पू. आजींच्या आवाजात कुठलाच पालट जाणवत नव्हता. असे असले, तरी ‘पू. आजींनाच विचारूया’, असे वाटून मी त्यांना स्पष्टपणे विचारले, ‘‘पू. आजी, आपण देह ठेवणार आहात का ?’’ यावर ‘‘नाही, एवढ्यात नाही. मला काहीही झालेले नाही’’, असे पू. आजींनी एकदम उत्साहाने सांगितले. यावरून ‘संत काळावर विजय मिळवतात’, हे किती सत्य आहे आणि ‘संत काळाची पावले चांगल्या प्रकारे ओळखू शकतात’, हे मला शिकायला मिळाले.
५. पू. आजींच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे
५ अ. देहत्यागापूर्वी – ‘पू. आजींचे ध्यान लागले आहे’, असे वाटणे : २८.१.२०२३ ला रात्री सौ. मीनल खेर यांचा मला निरोप आला, ‘घरी येऊन पू. आजींना पुन्हा बघून जाल का ?’ मी त्यांना रात्री ९:३० वाजता तपासण्यासाठी गेलो. तेव्हा ‘पू. आजींचे ध्यान लागले आहे’, असे मला वाटत होते.
५ आ. देहत्यागानंतर – पू. आजींचा चेहरा शांत आणि चैतन्यमय दिसणे : २९.१.२०२३ या दिवशी पहाटे मी पू. आजींना तपासण्यासाठी गेलो. तेव्हा पू. आजींनी ‘नुकताच देह ठेवला आहे’, असे मला जाणवले. त्यांचे शरीर गरम आणि मऊ लागत होते. त्यांची टाळू मात्र किंचित वर उचलल्यासारखी दिसत होती. त्या वेळी ‘त्यांनी ब्रह्मरंध्रातून प्राणत्याग केला आहे’, असे मला जाणवले. त्यांचा चेहरा शांत आणि चैतन्यमय दिसत होता.
पू. आजींनी माझ्याकडून त्यांची सेवा करवून घेतली, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. संपूर्ण खेर कुटुंबियांनी माझ्यावर विश्वास दाखवला, यासाठी मी त्यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो.’
– वैद्य मंदार श्रीकांत भिडे (आयुर्वेदाचार्य) रत्नागिरी (२०.१.२०२३)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |