माघ कृष्ण चतुर्थी (१०.२.२०२३) या दिवशी पू. मंगला खेर यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
१. ‘पक्षी पू. आजींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले आहेत’, असे जाणवणे
‘२९.१.२०२३ या दिवशी पू. मंगला खेरआजींचे पार्थिव घराबाहेर आणत असतांना अकस्मात् तेथे पक्षांचा एक थवा आला. पू. खेरआजींना हार घालून तेथून नेत असतांना तो थवा उडून गेला. त्या वेळी ‘ते पक्षी पू. आजींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते’, असे मला जाणवले.
२. पू. खेरआजींच्या देहत्यागानंतरच्या दहाव्या दिवशी जाणवलेली सूत्रे
२ अ. पू. आजींच्या देहत्यागानंतरचे दहाव्या दिवसाचे विधी होत असतांना तेथे गोमाता येणे : ७.२.२०२३ या दिवशी पू. आजींचे दहाव्या दिवसाचे विधी होत असतांना तेथे अन्य दोन जणांचे विधी चालू होते. त्या वेळी तेथे एक गाय येऊन पू. आजींचे विधी होत असलेल्या ठिकाणी थांबली. ती गाय जेथे उभी होती, तेथे विधीसाठी लागणारे साहित्य होते; पण गायीकडून त्या साहित्यात तोंड घालणे किंवा ते उडवणे, असे झाले नाही. ती गाय शांतपणे तेथे उभी राहून विधी पहात होती. विधी होत असतांना गुरुजी गायीसमोर आल्यास ती वाकून विधी पहाण्याचा प्रयत्न करत होती.
२ आ. पिंडाला शिवण्यासाठी कावळे लगेच येणे : विधी पूर्ण झाल्यावर पिंड घेण्यासाठी कावळ्यांना आवाज दिला, तेव्हा तेथे गुरुजी आणि श्री. मिलिंद खेर (पू. आजींचा मुलगा) हे दोघे जण उभे असतांनाही कावळे पिंडाला शिवत होते. अकस्मात् तेथे अनेक कावळे जमा झाले. त्या ठिकाणी कावळ्यांनी एक कणही शिल्लक ठेवला नाही.
२ इ. त्या ठिकाणी चिमण्याही आल्या होत्या.
३. ८.२.२०२३ या दिवशी सकाळी घरासमोर यापूर्वी कधीही न आलेला एक काळा कुत्रा आला होता.’
– सौ. स्नेहा रुपेश ताम्हनकर (पू. खेरआजींची नातसून, मुलीची सून), रत्नागिरी (८.२.२०२३)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |