वरिष्ठांकडून सिंधुदुर्ग पोलीसदलाचे कौतुक
मालवण – लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार्या तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या जत्रोत्सवात चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मालवण पोलिसांसह सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसदलाला जाते, अशा शब्दांत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी सिंधुदुर्ग पोलीसदलाचे कौतुक केले. या वेळी त्यांनी मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांचेही कौतुक केले.
कोरोना महामारीनंतर प्रथमच ४ फेब्रुवारीला ही जत्रा झाली. या जत्रेला लाखोंच्या संख्येने येणारे भक्त, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह येणारे नेते आणि लोकप्रतिनिधी अन् याच दिवशी भाजपने आयोजित केलेला मेळावा, हे सर्व गृहित धरून जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांनी जत्रेचे नियोजन केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, असे ४०० जण, तसेच मालवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी सेवारत होते.