ग्रंथालय चळवळीला सरकारकडून आर्थिक साहाय्‍याची अपेक्षा ! – डॉ. गजानन कोटेवार, अध्‍यक्ष, राज्‍य ग्रंथालय संघ

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन

वर्धा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – ग्रंथालय चळवळीमध्‍ये सर्वसामान्‍य लोक आहेत, त्‍यांना आर्थिक पाठबळाची आवश्‍यकता आहे. आर्थिक निधीअभावी ग्रंथालयाचा विकास झाला नाही. ग्रंथालयातील कर्मचार्‍यांची नाळ ग्रंथांशी जोडली आहे. त्‍यामुळे त्‍यांनी प्रतिकूल परिस्‍थितीत दिवस काढले; पण ग्रंथालये बंद केली नाहीत. वर्ष १९६७ मध्‍ये नियोजन आयोगाने ग्रंथालय चळवळीकडे लक्ष देण्‍यास सांगितले होते; मात्र त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. या चळवळीला केंद्र आणि राज्‍य सरकार यांच्‍याकडून आर्थिक साहाय्‍य मिळण्‍याची आशा आहे, असे प्रतिपादन

डॉ. गजानन कोटेवार यांनी ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या ‘ग्रंथालय चळवळीचे यशापयश’ या परिसंवादामध्‍ये बोलतांना केले.

भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर ग्रंथ संस्‍कृती टिकली पाहिजे ! – श्‍याम जोशी, बदलापूर

ग्रंथ संस्‍कृती

परिसंवादाचे अध्‍यक्ष श्‍याम जोशी म्‍हणाले, ‘‘ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांचा विकास झाला पाहिजे, साहित्‍य संमेलनाचा मूलाधार म्‍हणजे ग्रंथालय आहे. साहित्‍य संमेलनामध्‍ये ग्रंथपालाला प्रतिष्‍ठा मिळाली नाही, अद्यापपर्यंत एकाही ग्रंथपालाला राज्‍य पुरस्‍कार मिळालेला नाही; कारण शासनकर्त्‍यांनी ग्रंथांविषयीची संवेदनशीलता गमावली आहे.  आतापर्यंत केवळ २ वेळ ग्रंथालयांच्‍या संदर्भात परिसंवाद ठेवण्‍यात आला आहे, हे ग्रंथालय चळवळीचे अपयश आहे. ग्रंथपालाला आदराचे स्‍थान देण्‍याची आवश्‍यकता आहे. भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर ग्रंथ संस्‍कृती टिकली पाहिजे.’’