उपजतच दैवी गुण असलेल्‍या, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्‍यांचे मन जिंकणार्‍या आणि अध्‍यात्‍मातील अवघड टप्‍पेही लीलया पार करणार्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या संदर्भातील पूर्वीचे काही प्रसंग आठवतात. तेव्‍हा ‘त्‍यांच्‍यातील ईश्‍वरी गुण सुप्‍तावस्‍थेत होते’, हे आता माझ्‍या लक्षात येत आहे. ‘आज्ञापालन’ आणि ‘ईश्‍वरप्राप्‍तीची तीव्र तळमळ’ हे गुण अन् गुरुकृपेच्‍या बळावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘स्‍वतःतील दैवी गुण कसे विकसित केले ?’, याचे साक्षीदार असणार्‍या काही साधकांपैकी मीही एक आहे. माझ्‍या अल्‍प मतीला लक्षात आलेले आणि स्‍मरणात राहिलेले काही प्रसंग मी कृतज्ञतापूर्वक मांडण्‍याचा प्रयत्न करत आहे. (भाग १)

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
सौ. विजयलक्ष्मी आमाती

१. ईश्‍वर आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍यावर अढळ श्रद्धा असल्‍याने पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी गोव्‍याला येणारे गाडगीळ दांपत्‍य !

‘साधनेला आरंभ केल्‍यावर काही मासांतच डॉ. मुकुल गाडगीळ (आताचे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ) आणि  सौ. अंजली गाडगीळ (आताच्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांनी पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेतला अन् एप्रिल किंवा मे २००० मध्‍ये ते मुंबईहून गोव्‍याला रहायला आले. आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे त्‍यांनी पूर्वी कधी गोवा हे राज्‍य पाहिले नव्‍हते. ‘गोव्‍यात रहायला जमेल का ?’, अशा कोणत्‍याही प्रश्‍नांत न अडकता ते त्‍यांची ३  ४ वर्षांची मुलगी कु. सायली (आताची सौ. सायली सिद्धेश करंदीकर) हिला घेऊन गोव्‍यात रहायला आले. यातून ‘त्‍यांची ईश्‍वर आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर किती श्रद्धा होती ?’, ते लक्षात येते.

२. उच्‍चशिक्षित असूनही कुठलीही सेवा करण्‍याची सिद्धता असणे

तेव्‍हा आम्‍ही सर्व साधक फोंडा येथे रहात होतो. तेथे माझी सौ. अंजलीताईंशी ओळख झाल्‍यावर ‘त्‍या उभयतांचे पदव्‍युत्तर शिक्षण झाले असून दोघांनीही आपापल्‍या क्षेत्रांत ‘सुवर्णपदक’ (गोल्‍ड मेडल) प्राप्‍त केलेे आहे’, असे मला समजले. तेव्‍हा मी साप्‍ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये येणार्‍या ‘बालसंस्‍कार’ या सदराच्‍या संदर्भात सेवा करत होते. एक दिवस सौ. अंजलीताईंनी माझ्‍याकडे सेवा मागितली. ‘त्‍या टंकलेखनाची सेवा करतील का ?’, या विचाराने मी साशंकतेने त्‍यांना विचारले, ‘‘तुम्‍ही टंकलेखनाची सेवा करू शकाल का ?’’ तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘मी सेवा करण्‍यासाठीच येथे आले आहे. त्‍यामुळे तुम्‍ही मला कोणतीही सेवा द्या, मी ती करीन.’’

३. ‘सनातन प्रभात’साठी चौकटी बनवून त्‍यांची संरचना करायला शिकल्‍यावर ती सेवा इतरांनाही शिकवणे

‘सनातन प्रभात’

सौ. अंजलीताईंचा टंकलेखनाचा सराव झाल्‍यानंतर त्‍या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांसाठी वेगवेगळ्‍या विषयांवरील चौकटी बनवणे आणि त्‍यांची संरचना करणे, या सेवा शिकल्‍या. ‘मला या दोन्‍ही सेवा येत नाहीत’, हे ठाऊक असल्‍यामुळे त्‍या मला म्‍हणायच्‍या, ‘‘मी आता तुम्‍हालाही या सेवा शिकवीन.’’ त्‍यांनी मला २-३ वेळा आठवण करून देऊनही मी त्‍यांच्‍याकडे शिकण्‍यासाठी गेले नाही. एक दिवस त्‍यांनी मला बळजोरीने त्‍यांच्‍याजवळ बसवले आणि म्‍हणाल्‍या, ‘‘तुम्‍ही हे सर्व शिकून घ्‍या. आज ना उद्या ते उपयोगी पडेल !’’ त्‍यांनी मला त्‍या दोन्‍ही सेवा शिकवल्‍या.

४. कुठल्‍याही सेवेतून स्‍वतः आनंद घेऊन इतरांनाही आनंद देणार्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

त्‍या वेळी बर्‍याचदा मी आणि सौ. अंजलीताई भांडी घासायची सेवा करायचो. पाण्‍याची बचत व्‍हावी, यासाठी घासलेली भांडी विसळण्‍यासाठी पाण्‍याने भरलेले ३ मोठे ‘प्‍लास्‍टिकचे टब’ असायचे. एकीने भांडी घासायची आणि दुसरीने ती तिन्‍ही टबांतून धुवायची. माझे लक्ष भांडी पटापट घासून ती स्‍वच्‍छ करण्‍याकडे असायचे, तर सौ. अंजलीताईंचे लक्ष ‘त्‍या सेवेतून आनंद कसा घ्‍यायचा ?’, याकडे असायचे. घासलेली भांडी टबमध्‍ये ठेवतांना ती विशिष्‍ट आवाज करत गोलाकार तरंगत एकमेकांवर हळुवारपणे आपटायची. ते पाहून त्‍या आवाजावर आपली मान हलवून सौ. अंजलीताई म्‍हणायच्‍या, ‘‘भांडी कशी आनंदाने डोलत आहेत, पहा.’’ नंतर मलाही त्‍यांच्‍याप्रमाणे या सेवेतून आनंद घेता येऊ लागला.

५. ‘दिसेल ते कर्तव्‍य’ या शिकवणीनुसार आश्रमातील अव्‍यवस्‍थित साहित्‍य साधकांकडून नीट लावून घेणे

त्‍या वेळी आम्‍हा सर्व साधकांसाठी आश्रमजीवन नवीन होते. त्‍यामुळे प्रत्‍येक जण केवळ आपल्‍या सेवेपुरताच विचार करत असे. सामूहिक स्‍वच्‍छतेच्‍या माध्‍यमातून परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हाला ‘प्रत्‍येक सेवा माझीच आहे’, या भावाने संघटितपणे सेवा करायला शिकवायचे; परंतु ते आमच्‍या लक्षात यायचे नाही.

फोंडा येथील निवासस्‍थानी वरच्‍या माळ्‍यावर बांधकामाशी संबंधित असे साहित्‍य अव्‍यवस्‍थितपणे पडले होते. ते सर्वांना दिसूनही कोणीही ते व्‍यवस्‍थित ठेवण्‍याचा विचार किंवा कृती करत नव्‍हते. एक दिवस सकाळी सौ. अंजलीताई यांनी पुढाकार घेऊन सर्व साधकांना एकत्र बोलावून सांगितले, ‘‘आज आपण सर्वांनी मिळून ही जागा स्‍वच्‍छ करूया आणि नंतर आपल्‍या सेवेला जाऊया.’’ त्‍यांनी साधकांचे विविध गट करून प्रत्‍येक गटाला एकेक सेवा करायला सांगितली आणि सगळ्‍यांकडून साहित्‍य नीट लावून ठेवले. त्‍यानंतर सर्वांना तिथे चांगले वाटू लागले.

या प्रसंगातून ‘सौ. अंजली गाडगीळ ‘जाणूनी श्रींचे मनोगत’ या भावाने आणि ‘दिसेल ते कर्तव्‍य’, या प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या शिकवणीप्रमाणे सर्व सेवा करायच्‍या’, हे आता लक्षात येते.

६. आश्रमात शनिवारी होणार्‍या ‘हनुमत्‍कवच’ यज्ञासाठी लागणार्‍या सर्व साहित्‍याची सिद्धता करून ती सेवा परिपूर्ण रितीने करणे

वर्ष २००२ पासून काही साधकांना अनिष्‍ट शक्‍तींचा त्रास होऊ लागला. ‘हा त्रास दूर व्‍हावा’, यासाठी प.पू. दास महाराज ‘हनुमत्‍कवच’ यज्ञ करण्‍यासाठी फोंडा येथे यायचेे. त्‍या वेळी यज्ञाची पूर्वसिद्धता करण्‍याचे दायित्‍व सौ. अंजलीताईंनी समर्थपणे पेलले. यज्ञ शनिवारी असायचा. सौ. अंजलीताई गुरुवारी सर्व साहित्‍याची जमवाजमव करून ते स्‍वच्‍छ करून ठेवायच्‍या. यज्ञ झाल्‍यानंतर सर्व साहित्‍य स्‍वच्‍छ करून त्‍या संबंधित साधकांच्‍या घरी पोचवायच्‍या.

७. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंनी ‘अहं न्‍यून करा’, असे सांगितल्‍यावर अन्‍नपूर्णाकक्षात सेवा करून अल्‍पावधीत अहं न्‍यून करून त्‍यांचे मन जिंकणार्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ !

सौ. अंजली गाडगीळ ‘संगीत विशारद’ असल्‍यामुळे आश्रमात आल्‍यावर त्‍या संगीताशी संबंधित सेवा करू लागल्‍या. एकदा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी त्‍यांना सांगितले, ‘‘डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या तुलनेत तुमचा अहं अधिक आहे. तो न्‍यून करण्‍यासाठी प्रयत्न करा.’’ ते ऐकल्‍यावर त्‍यांनी अहं न्‍यून करण्‍याचा जणू ध्‍यासच घेतला. संगीताची सेवा थांबवून त्‍या अन्‍नपूर्णाकक्षात सेवा करू लागल्‍या. ‘दिवसभरात स्‍वतःचा अहं कुठे कुठे जाणवतो ?’, याचे निरीक्षण करून तो न्‍यून करण्‍यासाठी त्‍या देवाला शरण जाऊन त्‍याचे सतत साहाय्‍य घ्‍यायच्‍या. अशा प्रकारे चिकाटीने प्रयत्न करून त्‍यांनी अवघ्‍या दीड मासात अहं न्‍यून करून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे मन जिंकले.

एवढेच करून त्‍या थांबल्‍या नाहीत, तर त्‍यांना शिकायला मिळालेली सर्व सूत्रे त्‍यांनी सत्‍संगाच्‍या माध्‍यमातून सर्व साधकांना सांगितली. पुढे त्‍या सूत्रांच्‍या आधारे ‘अहं निर्मूलनासाठी साधना’, हा ग्रंथ प्रसिद्ध झाला.

– सौ. विजयलक्ष्मी आमाती, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२२)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/649832.html