‘सकाळी अल्पाहार करणे’, हे वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडवण्यास, तसेच रोग निर्माण होण्यास कारण ठरते’, असे महर्षि वाग्भट यांनी सांगणे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११५

वैद्य मेघराज पराडकर

‘लेखांक ११३’मध्ये आपण पाहिले होते, ‘वात, पित्त आणि कफ यांची ‘दुष्टी होणे (संतुलन बिघडणे)’ हेच सर्व रोगांचे कारण आहे.’

प्रातराशे त्वजीर्णेऽपि सायमाशो न दुष्यति ।
अजीर्णे सायमाशे तु प्रातराशो हि दुष्यति ।। – अष्टाङ्गसङ्ग्रह, सूत्रस्थान, अध्याय ११, श्लोक ५५

अर्थ : सकाळचे जेवण पचलेले नसतांना सायंकाळी जेवल्यास ते बहुधा दोषकारक (रोगकारक) ठरत नाही; परंतु सायंकाळचे (रात्रीचे) जेवण पचलेले नसतांना सकाळी खाल्ल्यास ‘दोष निश्चितपणे दुष्ट होतात. (वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन निश्चितपणे बिघडते.)’

केवळ ‘भूक लागणे’ हे जेवण पचल्याचे लक्षण नव्हे’, हे लक्षात घेणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. सकाळी अल्पाहाराच्या वेळेस रात्रीचे जेवण पचलेले नसते; पण नेहमीच्या सवयीमुळे भूक लागते आणि आपण अल्पाहार करतो. महर्षि वाग्भटांच्या वरील सूत्रानुसार नेमके हेच वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडवण्यास अन् रोग निर्माण होण्यास कारण ठरते. ४ दिवस निश्चयपूर्वक सकाळी अल्पाहार न केल्यास सकाळी भूक लागण्याचे बंद होते आणि थेट दुपारी जेवणाच्या वेळी भूक लागू लागते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२२)