विधानसभा प्रश्नोत्तरे…
|
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील ‘टीईटी’ परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारूढ पक्षातील मंत्री आणि आमदार यांच्याशी संबंधित २ भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २१ डिसेंबर या दिवशी सभागृहात अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी ‘विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नात पालट करण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करून त्याची माहिती सभागृहात देण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला.
१. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘टीईटी’ घोटाळ्यासंबंधी तारांकित प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की, हा प्रश्न ७ भागांचा होता; मात्र प्रश्नोत्तरांच्या सूचीत मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित २ भाग विधानमंडळ सचिवालयाने जाणीवपूर्वक वगळले.
२. ‘या ‘टीईटी’ घोटाळ्यामुळे गुणवत्ता सूचीतील अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ७० मध्ये एखादा प्रश्न स्वीकृत व्हावा, यासाठी त्याने एकूण १८ शर्ती पूर्ण करायला हव्यात. माझ्या प्रश्न सुचनेतील वगळलेले २ भाग १८ शर्तीमधील नेमक्या कोणत्या शर्ती पूर्ण करत नाहीत, हे मला कळले पाहिजे. तारांकीत प्रश्न सुचनेतील वगळलेला भाग विद्यमान मंत्री, सत्ताधारी आमदारांची मुले आणि नातेवाइक यांंच्याशी निगडित आहे’, असे पवार यांनी सांगितले.
३. संबधित शिक्षकांवर ६० दिवसांत सुनावणी घेऊन कारवाई करण्याचा आदेश असतांनाही केवळ काही मंत्री महोदय, काही आमदार आणि काही अधिकारी यांची मुले या घोटाळ्यात असल्याने कारवाईला विलंब होत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. या वेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ यांनी भाग घेतला.