जनतेच्या मनातील सरकारविषयीचा विश्वास संपुष्टात ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

  • नेहमीप्रमाणे विरोधकांचा चहापानावर बहिष्कार !

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याविषयी शिवसेनेची पूर्वीपासूनची भूमिका आहे !- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अजित पवार

नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदना संपली असून ‘ईडी’ सरकारमध्ये असलेला विसंवाद प्रतिदिन दिसतो. राज्याप्रती मुख्यमंत्र्यांची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील सरकारविषयीचा विश्वास संपुष्टात आला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे १९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर १८ डिसेंबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ द्यावे ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. आमची भूमिका स्पष्ट असतांना भाजपने याविषयी काहीच निर्णय घेतला नाही.’’ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आला.

अजित पवार पुढे म्हणाले की,

१. महापुरुषांविषयी सतत बेताल वक्तव्य करणे आणि अपशब्द बोलणे हे सतत चालूच आहे. या गोष्टींत ते क्षमा मागण्यासही सिद्ध नाहीत.

२. सीमाभागांतील गावे महाराष्ट्रात आली पाहिजे, असे सर्वांना वाटते; मात्र हे सरकार आल्यापासून सामोपचाराने हा प्रश्न सुटायच्या ऐवजी उलट ८६५ गावेच कर्नाटकात किंवा इतर राज्यांत जाण्याविषयी ठराव करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत असतांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले नाही.

३. अधिवेशन नागपूर येथे होत असतांना विदर्भातील सर्व स्तरांवरील अनुशेष वाढतो आहे. त्याविषयी ठोस भूमिका हे सरकार घेतांना दिसत नाही.

४. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतीवृष्टीत शेतकर्‍यांची अतोनात हानी झाली आहे. शेतकर्‍यांना पीक विमा मिळत नाही. खरेदी केंद्रे व्यवस्थितरित्या चालू केली जात नाहीत, हे या सरकारचे अपयश आहे. ज्या भागात पीक अमाप असेल, त्या भागात खरेदी केंद्र चालू झाले पाहिजे.

५. राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणावर बाहेरील राज्यात पळवण्यात आले आहेत. आपल्या राज्यातील लाखो युवकांना रोजगार मिळणार होता. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक विविध प्रकल्पांच्या माध्यमांतून होणार होती. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असणारे छोटे-मोठे उद्योगही निर्माण होणार होते. या सर्वांना महाराष्ट्र मुकला आहे.