हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या करमणुकीसाठी डिजिटल थिएटर उभारले !

१० मराठी चित्रपट दाखवणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून आमदारांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, तसेच संपूर्ण राज्यातून सनदी अधिकारी, सरकारी आणि निमसरकारी सेवेतील अधिकारी येथे आलेले आहेत. त्यांच्या करमणुकीसाठी अधिवेशनाच्या कालावधीत १९ डिसेंबरपासून चक्क १० मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी १८ डिसेंबर या दिवशी दिली. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर कलाकारांशी ‘ऑनलाईन’ संवादही घडवून आणला जाणार आहे. आमदार निवास परिसरातच वसंतराव देशपांडे सभागृह आहे. या सभागृह परिसरात १ तात्पुरते चित्रपटगृह उभारण्यात आले आहे.

शासकीय योजनांसाठी उपयुक्त !

नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी म्हणाल्या की, राज्यात सिंगल स्क्रिन संपत चालले आहे. दुर्गम आणि अतीदुर्गम भागात एका दिवसात हे एम्.डी.एम्.टी. उभारता येते. यातून शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासमवेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचेही मार्गदर्शन करता येते. सध्या प्रायोगिक तत्त्वावर उपयोग करू. लोकांचा प्रतिसाद पाहून प्रकल्प पुढे न्यायचा कि नाही हे ठरवू.

संपादकीय भूमिका

अधिवेशाचा वेळ बहुमूल्य आहे. सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यानंतर आणि जनतेचे सहस्रो प्रश्न प्रलंबित असतांना एकत्रित बसून समोरासमोर चर्चा करून सोडवण्याऐवजी अधिवेशनातील वेळ मनोरंजनासाठी देणे, हे संतापजनक आहे. जनतेच्या कराच्या पैशातून चालणार्‍या अधिवेशनाच्या कालावधीत असा विचार करणारे लोकप्रतिनिधी जनतेचे हित काय साधणार ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? यामुळे जनतेनेच या विरोधात आवाज उठवायला हवा !