समष्टी सेवेची तळमळ असलेल्या संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया गणेश देशपांडे (वय ६१ वर्षे) !

सौ. छाया देशपांडे

कु. चैताली डुबे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि कु. प्रियांका लोणे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), संभाजीनगर

१. उत्तम गृहिणी आणि सुगरण : ‘सौ. छाया देशपांडेकाकूंचे घर नियमित स्वच्छ आणि नीटनेटके असते. प्रतिदिन काकू दाराबाहेर रांगोळी काढतात. रांगोळी इतकी सुबक आणि भावपूर्ण असते की, ती पाहून आनंद वाटतो.

२. नियोजनकौशल्य : काकूंमध्ये उत्तम नियोजनकौशल्य हा गुण आहे. त्या कोणतेही नियोजन तपशीलवार करतात.

३. गुरूंप्रती श्रद्धा : काकूंची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा आहे. काकूंचे गर्भाशयाची पिशवी काढण्याचे मोठे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी त्यांनी सतत सूक्ष्मातून गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवले.

कु. प्रियांका लोणे

४. समष्टी सेवेची तळमळ : केंद्रातील प्रत्येक साधकाची सेवा व्हावी, यासाठी काकूंची प्रचंड तळमळ असते. त्यासाठी त्या प्रत्येक साधकाला वेळ देतात. त्यांच्या अडचणी सोडवतात.

५. शिकण्याची वृत्ती : काकूंना शारीरिक त्रास अधिक असूनही त्या उत्साहाने प्रत्येक नवनवीन सेवा शिकतात. सेवा करण्यासाठी धर्मजागृती सभांच्या वेळेस त्या अन्य जिल्ह्यांतही गेल्या होत्या.

६. उत्साहाने सेवा करणे : काकू दिलेली सेवा उत्साहाने करतात. त्यामुळे सहसाधकांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्यातील उत्साह वाढतो.

७. रुग्णाईत असतांनाही सत्संग घेण्यास सिद्ध असणे : ‘कधी बरे नाही म्हणून काकू झोपल्या आहेत आणि त्यांनी सेवा केली नाही’, असे कधीच होत नाही. काकूंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना बोलतांना दम लागायचा, तरीही त्या ‘ऑनलाईन’ सत्संग घेण्यास सिद्ध असायच्या.

८. सकारात्मक राहून सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग घेणे : काकू त्यांच्याकडील सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग एकाच दिवशी घेतात. कधी सहसाधक नसेल, तर पूर्ण विषय काकू घेतात. ‘मला जमणार नाही किंवा विषय घ्यायला अडचण आहे’, असे काकू कधीच म्हणत नाहीत.

९. साधकांप्रती प्रेमभाव : ‘काकू कितीही थकल्या, तरी त्यांच्याकडे आलेल्या साधकांना त्या चहा, दूध देऊन काहीतरी खाऊ दिल्याविना जाऊ देत नाहीत. मी, कु. चैताली, काकूंचे दीर आणि त्यांचे कुटुंबीय असे सर्वजण एकाच वाड्यात रहातो. काकू प्रत्येकाच्या वाढदिवसाला भेटवस्तू किंवा खाऊ आठवणीने देतात. प्रतिवर्षी आमच्या वाढदिवसाला काकू औक्षण करतात. त्यामुळे ‘आमची आई आमच्याजवळ नाही’, असे आम्हाला जाणवत नाही.

१०. धर्मकार्यासाठी त्याग करणे : एकदा सदगुरु स्वातीताई (सद्गुरु स्वाती खाडये) यांनी काकूंना ‘‘संभाजीनगरला साधिकांना रहाण्यासाठी सेवाकेंद्र मिळाले, तर बरे होईल’’, असे सांगितले. तेव्हा देशपांडे काकू आणि काकांनी कसलाही विचार न करता त्यांच्या घराचा तळमजला सेवाकेंद्रासाठी सर्व सोयींसह उपलब्ध करून दिला.’

११. मोक्षप्राप्तीचा ध्यास लागणे : ‘ग्रंथ अभियान’, ‘सनातन वही अभियान’ इत्यादी उपक्रम चालू आहेत. त्यातच मकरसंक्रांतीनिमित्त ‘धर्मदान अभियान’ही चालू झाले होते. याविषयी काकू म्हणाल्या, ‘‘गुरुमाऊलींनी आता साधकांना मोक्षाला घेऊन जाण्याचे अभियान चालू केले आहे. गुरुमाऊलींनी आपल्यासाठी यान पाठवले आहे आणि त्यात बसवून ते आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार आहेत’, असे वाटत आहे.’’ ‘यातून त्यांना मोक्षप्राप्तीचा ध्यास लागला आहे’, असे आम्हाला वाटले.

१२. काकूंमध्ये जाणवलेले पालट

कु. चैताली डुबे

१२ अ. परिस्थिती स्वीकारून सेवेसाठी प्रयत्न करणे : काकूंच्या केंद्रातील साधकांचा सेवेसाठी आवश्यक तेवढा प्रतिसाद नसायचा. पूर्वी साधक पुढाकार घेऊन सेवा करण्यास सिद्ध नसायचे. त्या वेळी काकूंना ताण यायचा. आता मात्र त्या सकारात्मक राहून म्हणाल्या, ‘‘ठीक आहे. कुणी नसेल, तर आपल्याला जमेल तेवढे करण्याचा प्रयत्न करूया. यातून आपली साधना होईल.’’ अशा प्रकारे त्या परिस्थिती स्वीकारून प्रयत्न करतात.

१२ आ. चुका स्वीकारणे आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असणे : पूर्वी काकूंच्या मनात अनेक प्रसंगात साधकांविषयी प्रतिक्रिया असायच्या. ‘प्रतिक्रिया माझ्या साधनेच्या प्रगतीतील अडथळे आहेत’, हे लक्षात आल्यावर त्यांनी सर्व स्वीकारले. त्यासाठी त्यांनी क्षमायाचना करायला आरंभ केला. प्रत्येक प्रसंगात त्यांनी ‘मी कुठे चुकले ?’, हे शोधायला आरंभ केला.

पूर्वी काकूंना चूक सांगतांना भीती वाटायची. आता काकूंनी स्वतःमध्ये एवढा पालट केला आहे की, काकू स्वतःच्या चुका प्रांजळपणे सांगतात. त्या इतरांनाही स्वतःच्या चुका आणि स्वभावदोष यांविषयी विचारतात. काकूंपेक्षा आम्ही वयाने लहान आहोत, तरीही त्या आम्हाला त्यांच्या चुका विचारतात. ‘मी कुठे अल्प पडते ? मी कसे प्रयत्न वाढवू ?’, हे विचारतात आणि सांगितलेले प्रयत्न तत्परतेने करतात.

१२ इ. साधकांना प्रोत्साहन देणे : केंद्रातील साधकांबद्दल काकूंच्या मनात आधी तीव्र पूर्वग्रह असायचे. त्यामुळे काकूंना त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणे जमायचे नाही. आता मात्र काकूंना साधकांविषयी प्रेम वाटते. त्यामुळे प्रत्येक साधकाची आवड, कौशल्य, उपलब्ध वेळ यानुसार थोडी तरी सेवा यासाठी काकू साधकांना प्रोत्साहन देतात.

१२ ई. यजमानांची काळजी न करणे : काकूंना पूर्वी यजमानांची काळजी वाटायची. ते बाहेर गेले आणि परत घरी यायला उशीर झाला, तर काकूंना फार काळजी वाटत असे; पण आता त्यांचा काळजी करण्याचा भाग अल्प झाला आहे.

१२ उ. प्रगतीचा विचार न करता साधनेचे प्रयत्न तळमळीने करणे : पूर्वी काकूंना ‘आपली प्रगती होईल कि नाही ?’, असे वाटायचे आणि मनात त्याविषयीचे विचार असायचे; पण आता प्रगतीचा कुठलाही विचार न करता त्या सहजतेने आणि तळमळीने साधनेचे प्रयत्न करत आहेत.

१२ ऊ. प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे

१२ ऊ १. स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू न्यून होणे : पूर्वीप्रमाणे आता काकूंच्या बोलण्यात सहसाधकांविषयी प्रतिक्रिया नसते. त्यांनी प्रेमभावासाठी प्रयत्न वाढवल्याने त्यांच्यातील पूर्वग्रहदूषितता आणि अधिकारवाणीने बोलणे हे स्वभावदोष अन् अहंचे पैलू न्यून झाले आहेत.

१२ ऊ २. सहसाधकांची साधना होण्यासाठी साहाय्य करणे :  केंद्रातील सर्व साधकांविषयी काकूंना मनापासून प्रेम वाटत आहे. केंद्रातील एक साधक बर्‍याच दिवसापासून सेवेत सहभागी नसायचा आणि तो व्यष्टी आढावाही देत नसे. त्यामुळे त्या साधकाला सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा सत्संग मिळत नव्हता. काकूंना ‘त्या साधकाची साधना झाली पाहिजे’, असे फार वाटायचे. त्यांनी स्वतःहून भ्रमणभाष करून त्या साधकाचा आढावा चालू केला.

१२ ऊ ३. सुनेला मुलीप्रमाणे प्रेम देणे : काकूंची सून पुणे येथे असते. काकू तिच्यावरही मुलीप्रमाने प्रेम करतात. काही दिवसांपूर्वी काकू पुणे येथे गेल्या होत्या. तिथून परत येतांना त्यांच्या सुनेच्या डोळ्यांत पाणी आले. ‘सासू सुनेच्या घरून निघतांना सुनेच्या डोळ्यांत पाणी येते’, असे उदाहरण आम्ही प्रथमच ऐकले.

१२ ऊ ४. स्वतःचे स्वभावदोष प्रतिमा न जपता सांगणे : पूर्वी जिल्ह्यामध्ये संत किंवा सद्गुरु आल्यावर काकूंचा प्रतिमा जपण्याचा भाग असायचा; परंतु आता काकू सहजतेने वागतात. या वेळी सद्गुरु जाधवकाका जिल्ह्यात आल्यावर काकूंनी स्वतःहून ‘मी पूर्वी कशी होते आणि गुरुमाऊलींनी आता मला कसे घडवले ?’, याविषयी सहजतेने सांगितले. यापूर्वी त्यांनी असे कधीच सांगितले नव्हते.’

सौ. अक्षरा दिनेश बाबते, संभाजीनगर (आध्यात्मिक स्तर ६७ टक्के)

सौ. अक्षरा बाबते

१. शारीरिक त्रास असतांनाही सेवा चालू ठेवणे : ‘काका आणि काकू मागील वर्षी आजारी होते. त्यांना तपासणीसाठी आधुनिक वैद्यांकडे नेहमी जावे लागायचे, तरीही त्या नेहमी ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सेवा यांसाठी वेळेवर उपलब्ध असायच्या.

२. प्रेमभाव : काका आणि काकू हे संभाजीनगर येथील पहिले साधक दांपत्य आहेत. जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येक साधक त्यांच्या संपर्कात आलेला आहे. पूर्वी त्यांच्याच घरी बैठका व्हायच्या. तेव्हा काकू आलेल्या साधकांना नवनवीन पदार्थ करून खाऊ घालायच्या.

३. गुरूंप्रती भाव : त्यांचे रहाते घर हे आश्रमच आहे. त्यांच्या घराला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चरणस्पर्श झाला आहे. त्यांच्या घरी परात्पर गुरूंचे अस्तित्व जाणवते. याविषयी काकू म्हणतात, ‘‘हे सर्व पूर्व-नियोजित असून गुरुदेवांनीच करून घेतले आहे आणि सर्व काही गुरुदेवांच्या कृपेमुळे होत आहे.’’
(सर्व सूत्रांचा दिनांक १८.१.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.