कराड येथे शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी ‘शिवतेज संघटने’च्या वतीने प्रशासनास निवेदन !

कराडचे नायब तहसीलदार बबनराव तडवी (डावीकडे) यांना निवेदन देतांना उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर

कराड, ७ डिसेंबर (वार्ता.) – येथील शासकीय जागेत ठिकठिकाणी अतिक्रमण करत अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, या मागणीचे छायाचित्रांसहित निवेदन ‘शिवतेज संघटने’च्या वतीने कराडचे नायब तहसीलदार बबनराव तडवी आणि कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात देण्यात आले. (शासकीय जागेत अतिक्रमण होत असलेले प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ? कि प्रशासकीय अधिकार्‍यांचा याला छुपा पाठिंबा आहे असे समजायचे ? शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी एखाद्या संघटनेला याची जाणीव करून कार्यवाही करण्याची मागणी करावी लागते, हे प्रशासनास लज्जास्पद आहे. – संपादक)

कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचे कार्यालयात निवेदन देतांना शिवतेज संघटनेचे कार्यकर्ते (मुख्याधिकारी अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍याजवळ निवेदन देण्यात आले.)

या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे थोर नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आणि शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे दगड रचून त्यास हिरवे कापड अन् रंग फासून अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे, तसेच कराडचे आराध्यदैवत श्री उत्तरालक्ष्मी मंदिराचा वाद न्यायालयात चालू आहे. या परिसरात झाडेही लावण्याची अनुमती नसतांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्र्याचे शेड, बगीचा आणि वेगवेगळ्या नावांच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. काही लोक हे जाणूनबुजून अतिक्रमण करत आहेत. अशा अतिक्रमणांमुळे भविष्यात तणाव निर्माण होऊ शकतो. तेव्हा प्रशासनाने वेळीच याची नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ पाठीमागील बाजूस असलेले अनधिकृत बांधकाम

या वेळी ‘शिवतेज संघटने’चे अध्यक्ष श्री. गणेश कापसे, भटक्या विमुक्त आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा हिंदु एकता आंदोलनचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. गणेश देसाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल कडणे, तसेच हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री विनायक चौगुले, युवराज शिंदे, अर्जुन होगाडे, हृषिकेश मुठेकर, सागर शिर्के यांसह शिवतेज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृहाच्या मागील बाजूस असलेले अनधिकृत अतिक्रमण

संपादकीय भूमिका 

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कार्यवाही का करत नाही ?