रत्नागिरी येथे वाहनफेरीच्या माध्यमातून भगवा झंझावात !

हिंदु राष्ट्राचा उद्घोष करत धर्मप्रेमींचा वाहनफेरीत उत्स्फूर्त सहभाग !

डावीकडून धर्मध्वज हातात धरलेले तरुण मित्रमंडळ तेली आळीचे श्री. अक्षय पावसकर, पुरोहित वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी, धर्मध्वजाचे पूजन करतांना श्री. अमर कीर

रत्नागिरी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – अनादी काळापासून वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा लाभलेली ही भारतभूमी अन् हिंदु धर्मावर अन्याय आणि अत्याचार यांची काजळी धरली आहे. संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश पुरवणारी हिंदु संस्कृती आज झाकोळली जात आहे. भारतभूमी आणि हिंदु धर्मावरील काजळी दूर करण्यासाठी, हिंदूंना जागृत आणि संघटित करण्यासाठी ३ डिसेंबर २०२२ या दिवशी मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रसारासाठी ३० नोव्हेंबर २०२२ या दिवशी  शहरातून वाहनफेरी काढण्यात आली. या फेरीत धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मारुति मंदिर येथे धर्मध्वजाच्या पूजनाने फेरीचा आरंभ झाला. नंतर रामआळी- गोखले नाका-काँग्रेसभुवन-टिळकआळी-झाडगाव नाका-स्वातंत्र्यलक्ष्मी चौक-गोखले नाका-मारुतिआळी येथून जयस्तंभ येथे येऊन फेरीची सांगता झाली. या फेरीला शेकडो धर्मप्रेमींची उपस्थिती लाभली. फेरीचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश लाड यांनी केले.

फेरीच्या प्रारंभी हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. अमर कीर यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. श्री महापुरुष मित्रमंडळ, कोकणनगरचे श्री. प्रसन्न बिर्जे यांनी धर्मध्वजाला हार अर्पण केला. गोसेवा संघ रत्नागिरीचे अध्यक्ष आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. गणेश गायकवाड यांनी मारुति मंदिर येथील श्री मारुतीला हार अर्पण केला. आम्ही फक्त शिवभक्त संघटनेचे श्री. किरण जाधव यांनी मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. तरुण मित्रमंडळ तेलीआळीचे श्री. मंदार पावसकर यांनी श्रीफळ वाढवले आणि फेरीला प्रारंभ झाला.

शहरातून चाललेली वाहनफेरी

पौराहित्य वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांनी केले. टिळक आळीमधून फेरी जात असतांना लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला भाजपचे रत्नागिरीचे ‘सोशल मिडिया’ समन्वयक श्री. धनंजय पाथरे यांनी, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला बजरंग दलाचे डॉ. अवधूत डवरी यांनी हार अर्पण केला.

या फेरीमध्ये श्री मरुधर विष्णु समाज, पाटीदार समाज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गोसेवा संघ, रत्नागिरी, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या माध्यमातून हिंदुत्वाची ज्वाला प्रज्वलित करायची आहे ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. विनय पानवळकर

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून आपल्याला हिंदुत्वाची ज्वाला प्रज्वलित करायची आहे. जगात ख्रिस्ती, मुसलमान यांची राष्ट्रे आहेत; मात्र एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. ही वस्तूस्थिती पालटण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत ? याचे मार्गदर्शन ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’मध्ये वक्ते करणार आहेत. ‘हिंदु धर्मा’च्या पुनरुत्थानासाठी धर्मकर्तव्य म्हणून  सभेला उपस्थित राहूया.