(म्हणे) ‘द कश्मीर फाईल्स’ हा असभ्य चित्रपट आणि एका मताचा प्रचार करणारा !

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील परीक्षकांचे प्रमुख तथा इस्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरील टीकेमुळे वादंग

  • गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रवक्ते यांच्याकडून नदव लॅपिड यांच्या विधानाचा निषेध

  • महोत्सवातील परीक्षकांच्या मंडळानेही विधानाशी घेतली फारकत !

  • इस्रालयच्या भारतातील राजदूताने महोत्सवाच्या आयोजकांची मागितली क्षमा

पणजी – वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे वास्तव दर्शवण्यारा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा एका मताचा प्रचार करणारा आणि असभ्य चित्रपट असल्याचे वादग्रस्त विधान गोव्यात संपन्न झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (‘आंचिम’मधील) चित्रपटांचे परीक्षण करणार्‍या मंडळाचे प्रमुख (‘ज्युरी’) तथा इस्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी केले आहे. या विधानानंतर निर्माते नदव लॅपिड यांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स यांनी लॅपिड यांच्या विधानाचा निषेध केला आहे. ‘आंचिम’च्या परीक्षक मंडळाने लॅपिड यांच्या विधानाशी फारकत घेऊन ‘हे विधान नदव लॅपिड यांचे वैयक्तिक मत आहे’, असे म्हटले आहे. इस्रालयचे भारतातील राजदूत नाओर जिलॉन यांनी नदव लॅपिड यांच्यावर टीका करतांना त्यांच्या विधानावरून भारतियांची क्षमा मागितली आहे.

काय म्हणाले होते नदव लॅपिड ?

सौजन्य : MOJO STORY

‘आंचिम’च्या २८ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या समारोप समारंभानंतर नदव लॅपिड मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘महोत्सवातील १५ वा चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच (परीक्षक मंडळाच्या सदस्यांना) धक्का बसला. आम्ही पुष्कळ अस्वस्थ झालो. आमच्या मते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा आहे आणि असभ्य चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणे हे आयोग्य आहे.’’

हा केवळ चित्रपट नाही, तर हे एक आंदोलन आहे ! – अनुपम खेर, कलाकार

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट म्हणजे काहींच्या गळ्यात अडकलेल्या काट्याप्रमाणे आहे. हा काटा गळ्यातून काढता येत नाही किंवा तो आपसूकच निघून जात नाही. ‘द कश्मीर फाइल्स’हा केवळ चित्रपट नाही, तर हे एक आंदोलन आहे. ‘टूलकिट’ (एखादी विचारसरणी पुढे रेटण्यासाठी योजना राबवणार्‍या ) टोळीने कितीही प्रयत्न केला, तरी चित्रपटातील सत्य लपवता येणार नाही.

लॅपिड यांच्याकडून ‘आंचिम’च्या व्यासपिठाचा दुरुपयोग ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नदव लॅपिड यांच्या विधानाविषयी अहमदाबाद (गुजरात) येथे पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले,‘‘निर्माते नदव लॅपिड यांनी ‘आंचिम’च्या व्यासपिठाचा दुरुपयोग केला आहे. या विधानाची राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि गोवा मनोरंजन संस्था गंभीर नोंद घेणार आहे. मी वादग्रस्त विधान करणारे नदव लॅपिड यांचा निषेध करतो.’’

हा तर अत्याचार भोगलेल्या काश्मिरी हिंदूंचा अवमान ! – सावियो रॉड्रिग्स, प्रवक्ते, भाजप

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा असे विधान करणे म्हणजे हा अत्याचार भोगलेल्या काश्मिरी हिंदूंचा अवमान आहे. एखाद्या चित्रपटावर कलेच्या दृष्टीकोनातून टीका करणे चालू शकते; मात्र काश्मिरी हिंदूंनी भोगलेल्या यातनांना ‘विशिष्ट विचारधारेचा प्रचार’, असे संबोधणे लज्जास्पद आहे. मी हा चित्रपट दोनदा पाहिला आहे. चित्रपटातून काश्मिरी हिंदूंनी भोगलेल्या यातनांचे सत्य दर्शन घडते. नदव लॅपिड यांनी सर्वप्रथम काश्मिरी हिंदूंशी संवाद साधणे आवश्यक आहे. ते काश्मीरमधील हत्याकांडांविषयी अनभिज्ञ असावेत.

इस्रालयचे भारतातील राजदूत नायोर जिलोन यांच्याकडून खुल्या पत्राद्वारे भारतियांची क्षमायाचना !

भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्यांना देवासमान पाहिले जाते. नदव लॅपिड यांचे विधान हे चित्रपट महोत्सवातील न्यायमंडळाचे प्रमुख पद देणार्‍या, तसेच विश्‍वास, मानसन्मान आणि आदरातिथ्य देणार्‍या भारतियांचा अवमान करणारे आहे. नदव लॅपिड यांना याविषयी लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी असे विधान करण्यामागील कारण स्पष्ट केले पाहिजे. वास्तविक नदव लॅपिड हे ‘हॉलोकास्ट’ (अत्याचार सहन केलेल्या) ‘ज्यू’ समुदायातील एक सुपुत्र आहे. त्यांच्या विधानाचा मी निषेध करतो. त्यांनी त्यांच्या वागण्याविषयी आत्मचिंतन करावे. मी त्यांच्या विधानावरून महोत्सवाच्या आयोजकांची क्षमा मागतो.

संपादकीय भूमिका

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत काही निर्माते-दिग्दर्शक यांनी याआधीही ‘कश्मीर फाइल्स’च्या विरोधात गरळ ओकली आहे. आंतराष्ट्रीय समुदायासमोर हिंदूंचा धर्मांध मुसलमानांनी केलेला नरसंहार पुढे न येण्यासाठी जी टोळी कार्यरत आहे, त्याचाच लॅपिड हा भाग आहेत, असे समजायचे का ?
  • लेपिड स्वतः ज्यू आहेत. ज्यूंवर हुकूमशहा हिटलर यांनी केलेल्या अत्याचारांविषयी अनेक चित्रपट निघाले. त्या वास्तववादी चित्रपटांमध्ये ‘असभ्य’ वर्णन होते, असे त्यांना म्हणायचे आहे का ?