देशी मिठाई आणि नमकीन यांच्या पॅकबंद पदार्थांवर आरोग्याला हानीकारक असल्याचे लेबल लागणार !

  • साखर आणि मीठ यांची मात्रा अधिक असणारी मीठाई आणि नमकीन यांच्यावर लेबल लावण्याची सूचना

  • इंदूर (मध्यप्रदेश) येथील व्यापार्‍यांचा विरोध

मीठाई

नवी देहली – पॅकबंद खाद्यपदार्थासाठी ‘भारतीय खाद्यपदार्थ संरक्षण आणि मानक प्राधिकरणा’ने (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने) नियम बनवलेले आहेत. याद्वारे साखर आणि मीठ यांची मात्रा अधिक असल्यास अशा खाद्यपदार्थांना आरोग्यासाठी हानीकारक ठरवले जाणार आहे. पॅकबंद खाद्यपदार्थांच्या डब्यावर अशा प्रकारचे लेबल लावण्यात येणार आहे. यावर हिरवा आणि निळा अशा रंगांचे गोल चिन्ह लावण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील इंदूर येथील व्यापार्‍यांनी याचा विरोध चालू केला आहे. मध्यप्रदेशातील मिठाई आणि नमकीन व्यापार्‍यांनी याविषयी प्राधिकरणाला पत्र लिहून याचा विरोध केला आहे. देशभरातील देशी मिठाई आणि नमकीन व्यवसायावर याचा परिणाम होणार असल्याचा दावा केला जात आहे. देशात नमकीनचा उद्योग ७०० कोटी रुपयांहूनही अधिक, तर मिठाईचा ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

१. मिठाई आणि नमकीन व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, भारतात कुणी मिठाई खाऊन पोट भरत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची चेतावणी डब्यावर लिहिणे चुकीचे आहे. अशा नियमांचा वाईट परिणाम लहान व्यापार्‍यांवर होईल आणि मोठ्या व्यापार्‍यांना लाभ होईल.

मोठ्या आस्थापनांच्या दबावामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक व्यापारी या उद्योगातून बाहेर पडले जावेत, असे विदेशी आस्थापनांची इच्छा आहे.

२. मध्यप्रदेश मिठाई आणि नमकीन निर्माता असोसिएशनचे सचिव अनुराग बोथरा यांनी सांगितले की, विदेशातील नियमांची नक्कल भारतात करून नियम बनवले जात आहेत. विदेशाच्या तुलनेत भारतातील खाद्य संस्कृती वेगळी आहे. भारतात मिठाई, लोणचे, नमकीन खाल्ले जाते. यात मीठ आणि साखर अधिक असतेच. त्यामुळेच ते पोटभर कुणी खात नाही. त्यामुळे यासाठी कोणतीही चेतावणी देण्याची आवश्यकता नाही.