मातेकडून नीती, पित्याची भीती आणि धर्माचरणात मती असणारी युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू शकत नाही ! – योगेश महाराज साळेगावकर, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार

हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी बीड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ७ सहस्रांहून अधिक हिंदू एकवटले !

श्री. योगेश महाराज साळेगांवकर

बीड, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी घरादाराचा त्याग केला. त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे दुर्दैवी ! सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर जनतेने आक्षेप नोंदवायला हवा. मातेकडून नीती, पित्याची भीती आणि धर्माचरणात मती ज्या युवतीकडे असते ती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडूच शकत नाही. मुलींना राणी पद्मावती, राणी लक्ष्मीबाई यांचा शौर्यशाली इतिहास न शिकवल्याने त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात. राष्ट्र संकटात असतांना हिंदु युवती धर्म पालटण्यासही सिद्ध होतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण द्या, असे प्रतिपादन योगेश महाराज साळेगावकर यांनी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.

स्त्रियांचे सर्वदृष्ट्या रक्षण करणार्‍या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार करा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये

पुढारलेपणाच्या नावाखाली आपण महान हिंदु धर्मापासून दूर चाललो आहोत. कपाळावर कुंकू लावण्याची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. यामागील धर्मशास्त्र समजून घेतल्यास ‘कुंकू लावणे’ हा मागासलेपणा वाटणार नाही. छत्रपती शिवरायांच्या काळात स्त्रिया सुरक्षित होत्या. त्यामुळे स्त्रियांचे सर्वदृष्ट्या रक्षण करणार्‍या हिंदवी स्वराज्याप्रमाणे महिलांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार करा.

सभेमध्ये आलेले हिंदू संघटनशक्तीद्वारे बीड येथील मंदिरांच्या रक्षणासाठी आंदोलन उभारतील ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये

बीड शहर आणि परिसरातील हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली काही महत्त्वाची मंदिरे अतिक्रमणसदृश विळख्यामध्ये आणली जात आहेत. या ठिकाणी श्रद्धाळू हिंदूंना भयमुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी आगामी काळात सभांच्या माध्यमातून संघटित झालेले हिंदू व्यापक आंदोलन उभे करतील. केवळ प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्याने अल्पसंतुष्ट न रहाता सर्व गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सिद्ध व्हा. हलाल उत्पादनांची अनिवार्यता हिंदूंना नाही. त्यामुळे हलाल उत्पादने अनिवार्य करणार्‍यांच्या विरोधात ग्राहक अधिकारांचा भंग करणे, धर्मस्वातंत्र्य नाकारणे यासंदर्भात तक्रारी प्रविष्ट करा.

उपस्थित मान्यवर

सभेला उपस्थित जनसमुदाय
सभेला उपस्थित मान्यवर डावीकडून अधिवक्ता स्वप्नील गलधर, अधिवक्ता मंगेश पोकळे आणि अधिवक्ता महेश धांडे

भाजपचे मंडल अध्यक्ष अधिवक्ता स्वप्नील गलधर, जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता महेश धांडे, ह.भ.प. कीर्तनकार प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी, श्री. संतोष सोहनी, करणी सेनेच्या अधिवक्ता संध्या राजपूत, अधिवक्ता मंगेश पोकळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. सुभाष जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपचे नवनाथ (अण्णा) शिराळे, शिंदेगटाचे उपजिल्हाप्रमुख जयसिंग (मामा) चुंगडे, उद्योजक शुभम धूत, सामाजिक कार्यकर्ते नितीन राजपूत, हिंदुत्वनिष्ठ उद्योजक श्री. प्रशांत आंबेकर, नगरसेवक जगदीश गुरखुदे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नवले.

क्षणचित्रे

१. मान्यवर वक्त्यांच्या हस्ते सनातन प्रकाशित ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा आणि त्यांचे शिष्यत्व’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

२. रविवार हा कमाईचा दिवस असूनही सभेचा विषय ऐकून प्रभावित झालेले बार्शी रस्त्यावरील ३५ हून अधिक ढाब्यांचे मालक ढाबे बंद ठेवून सभेला उपस्थित राहिले.

३. द्वारकाधीश मित्र मंडळाचे कार्यकर्ते गळ्यात भगवा शेला घालून घोषणा देत सभास्थळी आले.

४. सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु राष्ट्र हवे आहे ना ?’, असे विचारल्यावर उपस्थित धर्मप्रेमींनी दोन्ही हात वर करून अनुमोदन दिले.

अशी झाली सभा !

व्यासपिठावर उपस्थित डावीकडून सद्गुरु स्वाती खाडये, श्री. योगेश महाराज साळेगावकर आणि श्री. मनोज खाडये, वेदमंत्रपठण करतांना डावकडून वेदशास्त्रसंपन्न अनिल महाराज निर्मळ आणि त्यांच्या बाजूला वेदशास्त्रसंपन्न कैलास महाराज रामदासी

या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावातील ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. प्रारंभी श्री. विवेक झरकर यांनी केलेल्या शंखनादानंतर श्री. योगेश महाराज साळेगावकर आणि मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे वेदशास्त्रसंपन्न श्री. अनिल महाराज निर्मळ आणि वेदशास्त्रसंपन्न श्री. कैलास महाराज रामदासी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे बीड जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. विपुल भोपळे आणि अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा मांडतांना श्री. राजन बुणगे

सत्कार

श्री. मनोज खाडये यांचा सत्कार करतांना श्री. प्रशांत आंबेकर

श्री. योगेश महाराज साळेगांवकर यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी केला. श्री. मनोज खाडये यांचा सत्कार हिंदुत्वनिष्ठ उद्योजक श्री. प्रशांत आंबेकर यांनी केला, तर सद्गुरु स्वाती खाडये यांचा सत्कार सौ. रोहिणी बाभुळगावकर यांनी केला.

सभास्थळी प्रदर्शन पहातांना जिज्ञासू
सभेला उपस्थित जनसमुदाय
भ्रमणभाषमधील बॅटरीच्या दिव्यांद्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार करण्यास अनुमोदन करतांना उपस्थित धर्मप्रेमी