गायीला दिल्या जाणार्‍या प्रतिजैविकाचा परिणाम तिच्या दुधावरही होत आहे !

प्रतिजैविक असणारे दूध प्यायल्याने मनुष्याच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष !

न्यूयॉर्क (अमेरिका) – गायींना देण्यात येणार्‍या प्रतिजैविक (अँटिबायोटिक) इंजेक्शनमधील तत्त्व तिच्या दुधातही उतरल्याचे दिसून आले आहे. सामान्यपणे असे घडत नाही; परंतु डोस अधिक प्रमाणात असल्याने हे घडून येत आहे. अशा दुधाचा वापर लोक करतात, तेव्हा हळूहळू त्यांच्या शरिरात प्रतिजैविके काही प्रमाणात साठवली जातात. त्याचा फटका त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असल्याचे कार्नेल विद्यापिठाच्या अभ्यासातून समोर आले आहे.

१. अनेक लोक आजारपणाच्या काळात गायीच्या दुधाचा वापर करतात. त्यामुळे आजारपणाच्या उपचारावेळी दिल्या जाणार्‍या प्रतिजैविकांचा परिणाम अल्प होतो.

२. याविषयी डॉ. रेनाटा इव्हानेक म्हणाले की, जगभरातील प्रतिजैविकांचा अधिक वापर डेअरी क्षेत्रात उत्पादन वाढावे म्हणून केला जातो; परंतु जागतिक पातळीवर डेअरी उद्योगातील याचा वापर न्यून करणे आवश्यक  आहे. त्यासाठी अभ्यास करण्यात आला. प्रतिजैविक दुधाच्या डब्यावर ‘आर्एयू-लेबल’ लावण्यात आले. लोकांमध्ये लेबलयुक्त दूध खरेदी करण्याची इच्छा लेबलविरहित दुधाइतकीच असल्याचे दिसून आले.