काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील आरोप हे बुद्धीभ्रष्टतेचे लक्षण !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेसाठी तत्कालीन विविध राजकीय पुढार्‍यांनी केलेले प्रयत्न !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना क्षमेचे पत्र लिहिले होते’, असे सावरकरद्वेषी विधान काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वाशिम येथे ‘भारत जोडो’ यात्रेत केले. खरेतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेसाठी त्यांनी स्वतः प्रयत्न न करता लोकमान्य टिळक, मोहनदास गांधी आणि तत्कालीन स्वातंत्र्यविरांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांचा मागोवा घेणारा लेख येथे देत आहोत. यावरून राहुल गांधी खोटे बोलण्यासह स्वतःची बुद्धीभ्रष्टता आणि सावरकरद्वेष कसे दाखवून देत आहेत, हे लक्षात येईल.

१. लोकमान्य टिळक यांनी सावरकर यांच्या सुटकेसाठी केलेली मागणी

‘सावरकरांची प्रकृती अचानकपणे बिघडली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे’, असे वृत्त लोकमान्य टिळक यांना कळले. १९ सप्टेंबर १९१८ या दिवशी लोकमान्य टिळक चिरोल खटल्याच्या कामासाठी विलायतेला (विदेशात) जाण्यासाठी निघाले. खटल्याच्या कागदपत्रांमध्ये सावरकरांच्या खटल्याची कागदपत्रे होती. ते पाहून लोकमान्य टिळकांना सावरकरांच्या दुर्दशेची आठवण झाली. त्यांच्या मुखातून सहजतेने उद्गार निघाले, ‘‘केवळ राष्ट्राचे कल्याण व्हावे, या हेतूने प्रयत्न करत असतांना जन्मठेपेची शिक्षा देण्यापेक्षा अशा माणसाला एकदम ठार मारून टाकले, तर बरे होईल. कारागृहात आपले आयुष्य कंठित असतांना बिचार्‍याला किती मानसिक यातना सोसाव्या लागत असतात !’’

लोकमान्य टिळकांनी विलायतेतील भारतमंत्री माँटेग्यू यांच्यापर्यंत राजबंदींच्या सुटकेची मागणी केली होती, ती सावरकरांच्या अनुषंगानेच होय. (‘ग. म. नामजोशी यांची आठवण, लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका’, संपादक स.वि.बापट, खंड-एक, पृष्ठ ९१), (‘क्रांतिकल्लोळ’, लेखक – वि. श्री. जोशी, पृष्ठ ५२५)

२. मोहनदास गांधी यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी ब्रिटीश सरकारकडे बाजू मांडणे

श्री. दुर्गेश परुळकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कारागृहातून सुटका व्हावी, यासाठी मोहनदास गांधीजींनी २६ मे १९२० च्या ‘यंग इंडिया’मध्ये ‘सावरकर बंधू’ हा लेख लिहून त्यांच्या सुटकेसाठी ब्रिटीश सरकारकडे बाजू मांडली. ती अशी…

‘भारताच्या केंद्र आणि प्रांतिक शासनांमुळे राजक्षमेचा लाभ मिळून शिक्षा भोगत असलेल्या अनेकांची मुक्तता झाली आहे; पण अनेक प्रमुख राजबंदी अजूनही सुटलेले नाहीत. यात मी सावरकर बंधूंचाही समावेश करतो. ते पंजाबमधील सुटका झालेल्या राजबंद्यांप्रमाणेच राजकीय अपराधी आहेत. तरीही राजघोषणेनंतर ५ मासांनीही या बंधूंची सुटका झालेली नाही… हे स्पष्ट आहे… सावरकरांच्या (ज्येष्ठ म्हणजे बाबाराव सावरकरांच्या) विरुद्ध असलेले आरोप सार्वजनिक स्वरूपाचे आहेत. त्यांनी कुठलेही हिंसाचारी कृत्य केलेले नाही. ते विवाहित असून त्यांच्या २ मुलींचे पूर्वीच निधन झाले आणि १८ मासांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले आहे. दुसरे बंधू…जे त्यांच्या लंडनमधील कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर हत्येला साहाय्य केल्याप्रकरणी वर्ष १९११ मध्ये अभियोग प्रविष्ट झाला होता. त्यांच्याविरुद्ध हिंसेचे कुठलेच कृत्य सिद्ध झालेले नाही.

पंजाब शासनाने ज्या भाई परमानंदांना मुक्त केले, साधारण त्यांच्यासारखेच या बंधूंचे प्रकरण आहे. भाई परमानंदांनी प्रकटपणे आपण निर्दोष असल्याचे सांगितले असले, तरी त्यांचे प्रकरण सावरकर बंधूंहून वेगळे नाही. राजघोषणा झाली असतांनाही सावरकरांना कोणत्या कारणावरून मुक्त केले जात नाही, हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे; कारण त्यांच्यासाठी राजघोषणा हा राजाज्ञेने निर्माण झालेला एक निर्बंधच आहे.’ (‘सावरकर विस्मृतीचे पडसाद, १८८३-१९२४’ लेखक-विक्रम संपत, अनुवाद- रणजित सावरकर, ‘मंजिरी मराठी’, पृष्ठ ३२३-३२३)

३. दादासाहेब खापर्डे यांनी केलेला प्रयत्न

वर्ष १९२० च्या फेब्रुवारी मासात दादासाहेब खापर्डे यांनी ‘काऊन्सिल ऑफ स्टेट्स’ मध्ये सावरकरांच्या सुटकेची मागणी केली. हा ठराव विठ्ठलभाई पटेल यांचा होता. सरकारने त्या संबंधात काही करण्यास नकार दिला. याच मासात लोकमान्य टिळक यांनी माँटेग्यू यांना थेट पत्र धाडून सावरकरांच्या सुटकेची मागणी केली होती. (त्याचा उल्लेख आधी केलाच आहे.) ‘हिंदुस्थान सरकारच्या गृहमंत्र्यांनी आपण व्यक्तीगत राजबंद्यांच्या सुटकेचा विचार करण्यास सिद्ध होतो’, असे त्या वेळी म्हटले होते. त्याचाच संदर्भ देऊन सावरकरांनी ३० मार्च १९२० या दिवशी एक आवेदन सरकारला पाठवले.

४. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी ब्रिटिशांकडे निवेदन करणे

सावरकरांची सुटका झाली नाही, याचे सुरेंद्रनाथांना दुःख झाले. विनायक दामोदर सावरकर यांच्यासाठी सरकारला केलेल्या आवेदनात त्यांनी आपल्यासारखीच भावना व्यक्त केली. ‘सरकारने आपल्याला सोडले; पण सावरकरांना का सोडले नाही ?’, असा प्रश्न सुरेंद्रनाथांनी वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याकडे उपस्थित केला. ब्रिटीश सरकार सावरकरांची सुटका करण्यास विलंब लावत आहे. यामागील कारण सांगताना सुरेंद्रनाथांचे जावई बॅरिस्टर विजयचंद्र चॅटर्जी म्हणाले, ‘‘खरी गोष्ट ही आहे की, बंगाली लोक जसे सांगतात, तसे वागतील यावर ब्रिटीश सरकारचा विश्वास आहे; पण सरकारला मराठ्यांवर तसा विश्वास ठेवता येत नाही.’’ (‘क्रांतिकल्लोळ’, लेखक – वि.श्री. जोशी, पृष्ठ ५३३) यावरून ब्रिटीश सरकारच्या मनात सावरकरांविषयी काय भावना होती, ते लक्षात येते.

५. राहुल गांधी हा डोके ठिकाणावर नसलेला माणूस !

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीश सरकारची सेवा चाकरी केली असती आणि सरकारला सर्व प्रकारचे साहाय्य केले असते, तर वर ज्यांचा उल्लेख केला आहे, त्या राजकीय नेत्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले असते का ? डोके ठिकाणावर नसलेला माणूस वाटेल ते बोलतो आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सावरकरांसारख्या तेजस्वी पुरुषावर चिखलफेक केली जाते. हे बुद्धीभ्रष्टतेचे लक्षण आहे, हेच यावरून सिद्ध होते.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (१७.११.२०२२)

​संपादकीय भूमिका ​

राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्यावर टीका करणार्‍यांना जनतेने मतपेटीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्यावी !