उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा हवा ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ

नागपूर – उत्तरप्रदेशातील लव्ह जिहादविरोधी कायद्यानुसार मुसलमान व्यक्तीने हिंदु तरुणीशी विवाह करून तिचे धर्मांतर केल्यास ५ वर्षांचा कारावास आणि १५ सहस्र रुपये दंडाची, तर अनुसूचित जाती-जमातीची अथवा आदिवासी आणि अल्पवयीन मुलगी असल्यास किमान २ ते ७ वर्षे कारावास आणि २५ सहस्र रुपये दंडाची तरतूद आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा व्हायला हवा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी १७ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

सौ. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की,

१. राज्यात बळजोरीने आंतरधर्मीय विवाह लावले जातात, त्यांच्यासाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होणे आवश्यक आहे.

२. वसई येथील श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या करणारा तिचा प्रियकर धर्मांध आफताब याला फाशी दिली पाहिजे. तिची हत्या अंगावर काटा आणणारी ही घटना आहे.

३. नंदुरबार आणि भंडारा येथील घटनांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळात महिलांकडे कुणीही वाकड्या दृष्टीने पाहू शकत नाही.

४. प्रत्येक जिल्ह्यात मला मंत्री संजय राठोड यांच्याविषयी प्रश्‍न विचारले जातात; पण माझी न्यायालयीन लढाई चालू आहे. पीडिता माझ्या जातीची नव्हती कि माझ्या रक्ताची नव्हती. तरीही मी लढले.