बरेली (उतरप्रदेश) – रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाठी आलेल्या तपासनीसाने एका सैनिकाला धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना येथे घडली. बरेली रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेत सैनिकाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
(सौजन्य : Amrit Vichar)
प्राप्त माहितीनुसार बरेली रेल्वे स्थानकात १७ नोव्हेंबरला सकाळी फलाट क्रमांक २ वर दिब्रुगड-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये सुपक बुरे नावाच्या तिकीट तपासनीसाचा सैनिकासमवेत तिकीटावरून वाद झाला होता. या वेळी रागवलेल्या बुरे याने सैनिकाला थेट रेल्वेतून खाली ढकलून दिले. या धक्क्यामुळे सैनिक थेट रेल्वेखाली गेला आणि त्यातच त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. या सैनिकावर सध्या सैनिकी रुग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती रेल्वे अधिकार्याने दिली. या घटनेनंतर बुरे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागाचे वरिष्ठ वित्त व्यवस्थापक सुधीर सिंह यांनी दिली. बुरे याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा.द.वि.च्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रमुख अजित प्रताप सिंह यांनी दिली.
संपादकीय भूमिकासरकारने अशा असंवेदनशील तिकीट तपासनीसाला बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! |