प.पू. भक्तराज महाराज यांनी शिकवलेले सूत्र आत्मसात् करून ते साधकांना शिकवणारे आदर्श शिष्य डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. प.पू. भक्तराज महाराज यांनी आदर्श वागण्याचा घालून दिलेला वस्तूपाठ !

१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या समवेत कोर्लाई येथे जाणार्‍या भक्तांच्या २ – ३ गाड्यांतील एक गाडी बंद पडणे : ‘३.११.२०२१ या दिवशी मी ‘अमृतमय गुरुगाथा : खंड २’ – ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या अगम्य लीला आणि शिकवण)’ या डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करत होते.

‘प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) प्रसंगातून कसे शिकवले ?’, याविषयीचा एक प्रसंग या ग्रंथात आहे. एका प्रसंगात प.पू. बाबा आणि त्यांचे काही भक्त २ – ३ गाड्यांमधून कोर्लाई या ठिकाणी जात होते. या गाड्या एका पेट्रोल पंपाजवळ पोचल्यावर त्यांतील श्री. केतकर यांची गाडी बंद पडली.

सौ. सुमा पुथलत

१ आ. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘बंद पडलेली गाडी दुरुस्त झाल्यावर सर्व जण एकदम जाऊ’, असे सांगणे : बंद पडलेली गाडी दुरुस्त व्हायला वेळ लागणार होता. तेव्हा शिष्य डॉ. आठवले यांनी प.पू. बाबांना प्रार्थना केली, ‘‘आपण पुढे जाऊया. गाडी दुरुस्त झाल्यावर केतकर गाडी घेऊन येतील. तोपर्यंत तुम्हाला थोडी विश्रांती मिळेल. ते चालकाचे काम करतात. त्यामुळे त्यांना सवय आहे.’’ प.पू. बाबांचा वेळ जाऊ नये; म्हणून शिष्य डॉ. आठवले यांनी त्यांना असे सांगितले. तेव्हा प.पू. बाबा त्यांना म्हणाले, ‘‘तो चालक असला, तरी तो आपल्या समवेत इथपर्यंत आला आहे. त्यामुळे तो आपल्या समवेत पुढपर्यंतही येईल. आपण त्याची गाडी दुरुस्त होईपर्यंत इथेच थांबू.’’

(‘या प्रसंगात प.पू. बाबा हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी गुरुरूपात असल्याने त्यांचा उल्लेख ‘शिष्य डॉ. आठवले’, असा केला आहे.’ – संकलक)

२. ‘आदर्श वागणे कसे असावे ?’, याविषयी प.पू. भक्तराज महाराज यांनी शिकवलेले सूत्र परात्पर गुरुदेवांनी साधकांना शिकवणे

ग्रंथातील वरील प्रसंग वाचतांना मला पुढील प्रसंगाची आठवण झाली – प.पू. बाबांनी देहत्याग केल्याचे कळल्यावर मुंबईहून आम्ही काही साधक ३ गाड्यांमधून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निघालो होतो. आमची गाडी काही कारणांमुळे थोडी मागे राहिली होती. आम्ही सर्वांत शेवटी तिथे पोचलो. तेव्हा प.पू. गुरुदेव धावत आमच्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘लवकर जाऊन दर्शन घेऊन या. मी त्यांना थांबवून ठेवले आहे.’’ आमच्या आधी तिथे पोचलेल्या दुसर्‍या गाड्यांतील साधकांकडे पाहून प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘तुम्ही त्यांच्यासाठी थांबायला हवे होते. एकत्र आला असता.’’ तेव्हा ‘आदर्श वागणे कसे असावे ?’, याविषयी प.पू. बाबांनी जे शिकवले होते, ते प.पू. गुरुदेव आम्हा साधकांना शिकवत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

(‘येथे साधिकेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे गुरुरूपात असल्याने त्यांचा उल्लेख ‘प.पू. गुरुदेव’, असा केला आहे.’ – संकलक)

‘हे गुरुदेवा, ‘येणार्‍या आपत्काळात आणि इतर वेळीही तुमची ही शिकवण आमच्या लक्षात राहू दे अन् तुम्हाला अपेक्षित अशी कृती आम्हाला करता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. सुमा पुथलत, केरळ (३.११.२०२१)