राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व ६ दोषींची सुटका !

३१ वर्षांपूर्वी झाली होती हत्या

नवी देहली – भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असलेल्या सर्व ६ दोषींना मुक्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या दोषींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल, तर त्यांना मुक्त करण्यात यावे, असे न्यायालयाने आदेशामध्ये म्हटले आहे. नलिनी, रविचंद्रन्, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस अशी या ६ दोषींची नावे आहेत.

१. २१ मे १९९१ या दिवशी तमिळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे एका प्रचारसभेच्या वेळी आत्मघाती आक्रमण करून गांधी यांची हत्या करण्यात आली होती.

२. याप्रकरणी पेरारिवलन् याच्यासह ७ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. टाडा न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी पेरारिवलन् याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

३. दया याचिकेवरील निर्णयाला विलंब झाल्याचा आधार घेत पेरारिवलन्ला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आले होते.

४. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी मुक्त होणार आहेत. पेरारिवलन् आधीच या प्रकरणातून मुक्त झाला आहे.