हिंदूंनी वेळीच संघटित होण्‍याची आवश्‍यकता ! – अभिनेते शरद पोंक्षे

‘क्रांतीवीर वसंतदादा बडवे हिंदुत्‍व शौर्य’ पुरस्‍कार प्रखर सावरकरवादी वक्‍ते आणि ज्‍येष्‍ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना प्रदान ! 

पुरस्‍कार स्‍वीकारतांना ज्‍येष्‍ठ अभिनेते शरद पोंक्षे

पंढरपूर (जिल्‍हा सोलापूर), १० नोव्‍हेंबर (वार्ता.) – अनेक देश बहुसंख्‍यांक नागरिकांच्‍या धर्माच्‍या आधारावर ओळखले जातात; मात्र हिंदुस्‍थानात हिंदु बहुसंख्‍यांक असूनही हा देश निधर्मी समजला जातो. हिंदुस्‍थानात छत्रपती शिवरायांच्‍या पराक्रमाचे देखावे दाखवण्‍यास विरोध होतो, हा कसला सेक्‍युलरवाद ? हिंदूंना जाती-जातींमध्‍ये फोडण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत मतदार हा वर्षभरात मतदानाच्‍या वेळी एकदाच राजा असतो. त्‍यामुळे हिंदूंनी हिंदुहिताचा विचार करणाराच देशावर राज्‍य कसा करेल, याकडे लक्ष द्यायला हवे. त्‍यासाठी हिंदूंनी संघटित होण्‍याची आवश्‍यकता आहे, असे मत ज्‍येष्‍ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्‍यक्‍त केले. क्रांतीवीर वसंतदादा बडवे समिती आणि पंढरपूर हिंदु महासभा यांच्‍या वतीने प्रतिवर्षी देण्‍यात येणारा ‘क्रांतीवीर वसंतदादा बडवे हिंदुत्‍व शौर्य’ पुरस्‍कार ९ नोव्‍हेंबर या दिवशी प्रखर सावरकरवादी ज्‍येष्‍ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना प्रदान करण्‍यात आला. त्‍या वेळी ते बोलत होते.

व्‍यासपिठावर उपस्‍थित मान्यवर 

१. येथील संत तुकाराम भवन येथे आयोजित कार्यक्रमात कीर्तन आणि प्रवचनकार ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराज यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार देण्‍यात आला. या वेळी व्‍यासपिठावर कार्यक्रमाचे अध्‍यक्ष डॉ. संभाजीराव पाचकवडे, बार्शी येथील हिंदु महासभेचे प्रदेशाध्‍यक्ष अनिल पवार, अभयसिंह कुलकर्णी (इंचगावकर), मनसेचे नेते दिलीप धोत्रे, अभिनेत्री राधिका देशपांडे आणि नाट्यकलाकार विनय महाराज बडवे उपस्‍थित होते.

२. उपस्‍थितांचे स्‍वागत हिंदु महासभेचे अध्‍यक्ष बाळासाहेब डिंगरे यांनी केले, तर ध्‍वजगीत कु. रिद्धी आणि सिद्धी मकरंद हरिदास यांनी म्‍हटले. सत्‍कारमूर्ती आणि अतिथी यांचा परिचय पत्रकार श्री. महेश खिस्‍ते यांनी करून दिला. प्रास्‍ताविक श्री. अभयसिंह इंचगावकर यांनी केले, तर मानपत्राचे वाचन श्री. विवेक बेणारे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. सचिन लादे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. (सौ.) मैत्रेयी केसकर यांनी केले.