सातारा जिल्‍हा परिषदेने ‘शिवतीर्थ’ सातारा नगरपालिकेकडे हस्‍तांतरित करावे ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, १० नोव्‍हेंबर (वार्ता.) – शहरातील पोवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर म्‍हणजे शिवतीर्थ हे सातारा जिल्‍हा परिषदेने सातारा नगरपालिकेला हस्‍तांतरित करावे, अशी मागणी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्‍हणाले की, ग्रेड सेपरेटरच्‍या कामातून उरलेल्‍या ८५ ते ९० लाख रुपयांतून काही जणांनी हट्टापोटी शिवतीर्थाचे काम हाती घेतले; मात्र ते तेवढ्या पैशांत होणार नाही, हे लक्षात आल्‍याने काम अर्धवट राहिले. हे काम पूर्ण होण्‍यासाठी अजून २ ते २.५ कोटी रुपये लागणार आहेत. ‘हा निधी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करून द्यावा’, अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍याकडे केली आहे. देसाई यांनीही ही मागणी मान्‍य केली आहे. यंदा दीपावलीमध्‍ये जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने शिवतीर्थावर कोणतीही विद्युत् रोषणाई करण्‍यात आली नाही. त्‍यामुळे स्‍वराज्‍याची राजधानी असलेल्‍या सातारा शहरातील शिवतीर्थ अंधारात होते. मुळात जिल्‍हा परिषदेकडे निधीच नाही. शासनाकडून निधी आल्‍यानंतर शिवतीर्थावर निधी व्‍यय करण्‍यात येतो. सद्यस्‍थितीत शिवतीर्थावर सुरक्षारक्षक नाही. त्‍यामुळे जिल्‍हा परिषदेने शिवतीर्थ नगरपालिकेकडे हस्‍तांतरित करावे. नगरपालिकेकडे निधी असतो, तो शिवतीर्थावर व्‍यय करण्‍यास काहीही अडचण येणार नाही. सध्‍या जिल्‍हा परिषद आणि नगरपालिका यांमध्‍ये प्रशासक आहेत. त्‍यांनी तातडीने यामध्‍ये लक्ष घालून निर्णय घ्‍यावा.