ज्ञानवापी खटल्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश होणार !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (डावीकडे)

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी खटल्याच्या प्रकरणात आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही सहभागी होणार आहेत. यातील एक पक्षकार असणारा ‘विश्‍व वैदिक सनातन संघ’ या खटल्याची ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’ (अटी, शर्ती यांसह देण्यात येणारा सर्वाधिकार) योगी आदित्यनाथ यांना देणार आहे. याच संघाकडून ज्ञानवापीतील ‘शिवलिंगाचे ‘कार्बन डेटिंग’ (वस्तूचे आर्युमान मोजणे) करण्यात येऊ नये’, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती.

विश्‍व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह विसेन यांनी सांगितले की, ज्ञानवापी परिसराशी संबंधित सर्व खटले आमच्याकडूनच प्रविष्ट करण्यात आले होते; मात्र वर्तमानात केवळ ५ खटले आम्ही पहात आहोत. या पाचही खटल्यांचे सर्वाधिकार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात येणार आहेत. या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया चालू असून ती १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल.