केनियामध्ये बालाजी टेलिफिल्मचे माजी कार्यकारी अधिकारी आणि अन्य एका भारतियाची हत्या

जुल्फिकार खान

नैरोबी (केनिया) – जुलै मासामध्ये बेपत्ता झालेल्या २ भारतियांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रूटो यांचे सहकारी डेनिस इटुम्बी यांनी या संदर्भात दिलेल्या अहवालात म्हटले आहे, ‘दोन्ही भारतियांची केनियाच्या ‘किलर’ (गुप्तचर पोलिसांना तेथे ‘किलर पोलीस’ म्हटले जाते) पोलिसांनी हत्या केली.’ जुल्फिकार खान आणि त्यांचे मित्र महंमद झैद सामी किडवई अशी या दोघांची नावे आहेत. यातील खान हे ‘बालाजी टेलिफिल्म’चे माजी कार्यकारी अधिकारी होते. ते एका क्लबमधून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. दोघेही केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रूटो यांच्या प्रचार मोहिमेत माहिती आणि संपर्क यांचे दायित्व सांभाळण्यासाठी गेले होते.

१. इटुम्बी यांनी दावा केला की, पुराव्यांनुसार दोघे एका टॅक्सीमध्ये होते आणि ती डीसीआय  युनिटने (पोलिसांची गुप्तचर शाखा) थांबवली. यानंतर खान, किडवई आणि त्यांचा चालक या सर्वांचे अपहरण करून खान अन् किडवई यांची हत्या करण्यात आली.

२. जुलैमध्ये दोघे बेपत्ता झाल्याचे वृत्त आल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केनियन सरकारशी संपर्क साधला होता. तत्पूर्वी बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूर यांनी खान यांच्याविषयी इंस्टाग्रामवरून आवाहन केले होते.