तव चरणी अर्पण होण्या पुष्परूप हवे मला ।

१३.६.२०२० या दिवशी श्रीकृष्णरूपी गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) मानसपूजा करतांना मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांनी मला खालील ओळी सुचल्या. ‘गुरुदेव हेच माझे देव आणि तेच माझी पूजा’, असा भाव ठेवून मी त्यांच्याच कृपेने स्फुरलेले हे प्रार्थनारूपी काव्य त्यांच्याच चरणी अर्पण करते.

कु. अवनी छत्रे

कृष्णा, आहे एक प्रार्थना । विनवणी ऐक ना एकदा ।
एवढेच मागणे आता । शरण आले मी तुला ।। १ ।।

पहाता रूप तुझे मोहक । होते माझे मन प्रफुल्लित ।
तुझा शेला अन् पितांबर । दोन्ही आहेत भाग्यवंत ।। २ ।।

मोरपीस आणि मुकुट तुझा । पाहून शांती मिळे जिवा ।
माझे ध्येय, तुझ्या पादुका । भक्तांसी हवा तोच आसरा ।। ३ ।।

तुझी ती वेणू मधुरशी । तव कंठीची वैजयंती ।
सुदर्शन, शंख अन् पद्म । पाहून भक्ती येते दाटून ।। ४ ।।

तव पूजेतील चंदन अन् । हरिद्रा, अक्षतादी कुमकुम् ।
अभिषेकातील पंचामृत । घालण्या वरी शुद्धोदक ।। ५ ।।

धूप-दीप नैवेद्य ते मोठे । आरती ती भव्य विलक्षण ।
पूजेसाठी सर्वकाही तुझेच । तन-मन-धनाने समर्पण ।। ६ ।।

सर्वांगी तव रूप दिसे । पण एक स्थान मज रिक्त हवे ।
तव चरणी अर्पण होण्या । पुष्परूप मला द्यावे ।। ७ ।।

– कु. अवनी दीपक छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा.  (३१.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक