१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करत असतांना त्यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे आणि प्रार्थना करतांना ‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा वरदहस्त डोक्यावर आहे’, असे जाणवून आनंद मिळणे
‘९.९.२०२१ या दिवशी मला गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. श्री गुरुदेवांचे स्मरण करत असतांना मी प्रार्थना केली, ‘या जीवनाची यात्रा शिवयात्रा होऊ दे.’ तेव्हा मला ‘शिवस्वरूप आणि विष्णुस्वरूप गुरुमाऊली माझ्या आजूबाजूला आहे’, असे सातत्याने जाणवत होते. त्या वेळी प्रार्थना करतांना ‘सद्गुरु जाधवकाकांचा (सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा) वरदहस्त माझ्या मस्तकावर आहे’, असे मला अनुभवता येत होते. हे सर्व आपोआपच घडत होते. ‘एका वेगळ्याच आनंदाच्या लहरी माझ्या आजूबाजूला आहेत’, असे मला वाटत होते.
२. ‘गुरुदेवांनी तुला नमस्कार सांगितला आहे’, हा मुलीने दिलेला निरोप ऐकून ‘देव भक्तांना नमस्कार करतो’, असे वाटणे आणि ‘तुमच्या कृपेसाठी पात्र बनवा’, अशी गुरुदेवांना प्रार्थना करणे
रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील माझी मुलगी कु. सानिका हिने एकदा मला ‘गुरुदेवांनी तुला नमस्कार सांगितला आहे’, असा निरोप भ्रमणभाषवरून दिला. तेव्हा ‘काय उत्तर द्यावे ?’, हेच मला कळत नव्हते. ‘देव भक्तांना नमस्कार करतो’, हे केवळ आणि केवळ सनातनमध्येच घडू शकते. ज्या भगवंताच्या कृपेसाठी भक्त त्याचे संपूर्ण जीवन व्यतीत करतो, तो विष्णुरूपातील भगवंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांवर कृपारूपी मोत्यांची मुक्तहस्ताने उधळण करतो. ‘आपणच ते घेण्यास न्यून पडत आहोत’, असे वाटून माझ्या मनाला खंत वाटली. तेव्हा मला वाटले, ‘ खरोखरच आमची झोळी फाटकी आहे हो !
गुरुमाऊली, तुमच्या कृपेसाठी तुम्हीच आम्हाला पात्र बनवा. गुरुमाऊली, आम्ही तुमच्या चरणी संपूर्णपणे शरण आलो आहोत.’
३. मुलीने ‘तुझे आई-बाबा चांगले आहेत; म्हणून तुम्ही भावंडे चांगली आहात’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा निरोप दिल्यावर ‘सर्वकाही परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच आहे’, अशी कृतज्ञता वाटणे
गुरुमाऊलीने मला नमस्कार सांगितला. तेव्हा त्यांनी सानिकाजवळ पुढील निरोपही पाठवला, ‘‘सानिका, तुझे आई-बाबा किती चांगले आहेत; म्हणून तुम्ही (सानिका आणि ईशान (सानिकाचा लहान भाऊ)) चांगले आहात.’’ हे ऐकून माझ्या मनात विचार आला, ‘हे गुरुमाऊली, सानिका आणि ईशान यांच्यामध्ये जे काही चांगले आहे, ते तुम्ही त्यांना घडवल्यामुळे आहे. त्यांच्यात (सानिका आणि ईशान यांच्यामध्ये) अन् आमच्यात जे काही स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आहेत, ते आमच्यामुळे आहेत. ते संपूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता आमच्यात नाही. ते केवळ तुमच्या संकल्पाने नष्ट होत आहेत.
गुरुमाऊली, आम्ही तुमचा हात धरला नाही; पण तुम्हीच आमचा हात धरून ठेवल्यामुळे आम्ही आज साधनेत आहोत. तुम्ही आमचा हात धरून ठेवला नसता, तर आज आमची स्थिती स्वभावदोष, अहं आणि मायेचे जंजाळ यांत फसून ‘मी’पणाच्या डोहात बुडून कधीच मरणोन्मुख झाली असती. केवळ तुम्ही आहात; म्हणून या जीवनात संजीवनी आहे. जे काही चांगले वाढीस लागले, ते तुमच्यामुळे गुरुमाऊली !
४. साधकांना साधना आणि त्याच समवेत सूक्ष्मातील अभ्यास करायला शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
तुम्ही आम्हाला आपल्या कृपाछत्राखाली घेतले. तेव्हा आम्हाला साधनेचा गंध नव्हता. आपण देवाचे करतो, त्यालाच साधना समजून आणि ‘तेच योग्य आहे’, असे वाटून आम्ही चालत राहिलो असतो, तर आज त्याच स्थितीत राहिलो असतो. ‘साधनेतील आनंद कसा घ्यायचा ? भावप्रयोग म्हणजे नेमके काय ? संत आणि सद्गुरु यांचे भावविश्व कसे असते ? देवाशी कसे बोलायचे ? भक्त व्हायचे, म्हणजे नेमकेपणाने काय करायचे ? त्यासाठी कसे प्रयत्न करायचे ? या घनघोर कलियुगात पुराणांमधील भावविश्व कसे अनुभवायचे ?’, हे सर्व तुम्हीच भक्तीसत्संगांच्या माध्यमातून आम्हाला शिकवले. ‘मानसपूजा कशी करायची ?’, हे शिकवणारे तुम्हीच ना गुरुमाऊली ! ‘डोळे बंद करून विष्णुस्मरण करायचे, प्रत्येक क्षणी तुमचे स्मरण कसे करायचे ?’, हे सद्गुरूंच्या सत्संगातून शिकवणारे श्री गुरु आपणच आहात गुरुमाऊली ! ‘स्वतःमधील पालट कसे अभ्यासायचे ? सूक्ष्म प्रयोगात काय जाणवते ?’, हे शिकायला सांगून मन एकाग्र करायला शिकवणारेही आपणच आहात गुरुमाऊली !
५. आदि-अंत नसलेल्या आणि स्थळ-काळ-वेळ यांच्याही पलीकडे असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘तुमचे कार्य, साधकांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ आणि मृत्यू झालेल्या साधकांची साधनेतील प्रगती’, या सर्व गोष्टी संत आम्हाला सांगतात. तेव्हा गुरुमाऊली, ‘आपण किती महान आहात आणि आम्ही शून्य आहोत !’, हे प्रकर्षाने जाणवते, तरी तुम्हीच आम्हाला मोठेपण देत आहात. आपले कार्य बुद्धीच्या पलीकडील आहे. गुरुमाऊली, तुम्ही स्थळ-काळ-वेळ यांच्याही पलीकडे आहात. गुरुदेवा, तुम्ही अलीकडे आहात आणि पलीकडेही आहात. तुम्हाला आदि, मध्य आणि अंत नाही. ‘तुम्ही ज्या पद्धतीने साधकांना घडवत आहात, ते कसे घडत आहेत ?’, हे जाणण्याची, ते ओळखण्याची या जिवाची यत्किंचित्ही पात्रता नाही. ‘गुरुमाऊली, हा जीव तुमच्या चरणी शरण आला आहे. मला आपल्या चरणांशी ठेवा. या जिवाकडून शेवटच्या श्वासापर्यंत सेवा आणि साधना करवून घ्या’, अशी आपल्या दिव्य चरणी प्रार्थना आहे.
६. दगडातून सुंदर आणि सुबक देवाची मूर्ती घडवणार्या शिल्पकाराप्रमाणे एक नव्हे, तर सहस्रो साधकांना घडवणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी भावपूर्ण नमन !
शिल्पकार दगडातून मूर्ती सिद्ध करतो. त्यामुळे तो दगड नमस्काराला पात्र होतो. ‘त्या मूर्तीकाराने दगडातून मूर्ती निर्माण करतांना किती कष्ट घेतले ?’, हे कुणी बघत नाही; पण ‘मूर्ती छान आहे’, असे म्हणतात. लोक मूर्तीला फुले वाहून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तिला प्रार्थना करतात. खरा नमस्कार, खर्या प्रार्थना त्या मूर्तीकाराला झाल्या पाहिजेत; कारण मूर्तीकारामुळेच जगाला दगडातील देवाची ओळख होते. हा मूर्तीकार, म्हणजे साक्षात् भूवैकुंठनिवासी गुरुरूपातील अवतार, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले ! एकच नाही, तर एकाच वेळी सहस्रो साधकांना घडवणार्या गुरुमाऊलीच्या चरणी भावपूर्ण नमस्कार !’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आताची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२१)
|