जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री. संजय घाटगे यांचे ‘निर्विचार’ या नामजपावर झालेले चिंतन !

‘मिरज (जिल्हा सांगली) येथील वैद्या मृणालिनी भोसले प्रतिदिन पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत साधकांसाठी प्राणायामाचे ‘ऑनलाईन’ वर्ग आणि ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप घेतात. या वेळेत गुरुदेवांनी करायला सांगितलेला ‘निर्विचार’ हा नामजप करतांना माझे झालेले चिंतन पुढे दिले आहे.

श्री. संजय घाटगे

१. ‘आनंद’ते ‘ब्रह्म’ येथपर्यंत टप्प्याटप्प्याने झालेले चिंतन 

५.५.२०२२ या दिवशी पहाटे ५.३५ वाजता मी सामूहिक नामजपात सहभागी झालो होतो. मी हा नामजप करत असतांनाच ‘हा नामजप करायला का सांगितला असावा ?’, यावर माझे चिंतन चालू झाले. तेव्हा मला वाटले, ‘आरंभी आपल्याला सत्संगात ‘सुख-दु:ख हे मनातील वैचारिक संघर्षामुळे होते’, असे सांगितले होते. न्यूनतम विचार, म्हणजे आनंद आणि विचारविरहित मन, म्हणजे ‘सच्चिदानंद’ नव्हे का ? विचाररहित मन, म्हणजे स्थिर मन, म्हणजेच ‘स्थितप्रज्ञता !’ खांबाला साखळी बांधलेली असते. ती साखळी कुत्र्याच्या गळ्यात बांधलेली असते. खांब स्थिर असतो; पण तो कुत्रा त्या खांबाभोवती घिरट्या घालत असतो. घिरट्या घालणारा कुत्रा, म्हणजे आपले मन, जे विचारांच्या मागे घिरट्या घातल्याप्रमाणे सैरावैरा धावत असते, ती म्हणजे ‘माया.’ यातील खांब स्थिर असतो, म्हणजे ‘ब्रह्म’ !

२. ‘निर्विचार’ या नामजपाशी एकरूपता साधणे, म्हणजे काळावरच विजय प्राप्त करणे 

गुरुदेवांनी करायला सांगितलेला ‘निर्विचार’ हा नामजप ‘साध्य’ नसून ‘साधन’ आहे, तर ‘त्या नामजपाशी एकरूप होणे’, हे ‘साध्य’ आहे. नाम, नामी (ना-मी), असे झाले पाहिजे. मी नाहीच. केवळ तो एकमेवच आहे. ही एकरूपता साधणे, म्हणजेच मनातील ‘द्वैतभाव’ नष्ट होणे, म्हणजेच अद्वैत. कोणत्याही नामासह त्याचे ‘सामर्थ्य’, म्हणजे त्याची ‘शक्ती’ ही कार्यरत असतेच. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यासमवेत शक्तीही असते’, या तत्त्वानुसार, म्हणजेच ‘निर्विचार’ हा नामजप जेव्हा आपल्या मनावर बिंबला जातो, म्हणजे मनावर अधिराज्य करतो, त्या वेळी मनातील (अनावश्यक) विचार नष्ट होणार नाहीत का ? हे आपले साध्य आहे, म्हणजेच आरंभी सांगितलेली सच्चिदानंद स्थिती. हे आपल्याला कुणी सांगितले, तर सच्चिदानंद परब्रह्म अशी स्थिती प्राप्त केलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी, म्हणजेच हे त्रिकालाबाधित सत्य. (म्हणजेच त्रिकाळाची ज्याला बाधा होत नाही.) या नामजपाशी एकरूपता साधणे, म्हणजे काळावरच विजय प्राप्त करणे नव्हे काय ? हे अवघड निश्चित आहे; पण अशक्य मात्र निश्चितच नाही; कारण गुरुदेव आपल्याला अशक्यप्राय असे कधी काही सांगतच नाहीत ना !’

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, कोल्हापूर. (५.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक