काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

नवी देहली – गेल्या १८ वर्षांत केंद्रातील काँग्रेस आणि भाजप यांच्या सरकारांच्या काळात सुमारे २०० नेत्यांवर सीबीआयने गुन्हे नोंदवले, धाडी टाकल्या, त्यांना अटक केली किंवा त्यांची चौकशी केली. त्यांपैकी ८० टक्के नेते विरोधी पक्षांचे होते. काँग्रेसच्या काळात ६० टक्के, तर वर्ष २०१४ मध्ये सत्तेत असल्यानंतर भाजपप्रणीत सरकारच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या लोकांवर अन्वेषण यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली.

काँग्रेसच्या सरकारच्या १० वर्षांच्या (वर्ष २००४ ते २०१४) काळात ७२ नेत्यांचे सीबीआयकडून अन्वेषण करण्यात आले आणि त्यांपैकी ४३ (६० टक्के) विरोधी पक्षांचे होते. तर भाजपच्या सरकारच्या गेल्या ८ वर्षांच्या काळात १२४ प्रमुख नेत्यांना सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागले. त्यांपैकी ११८जण विरोधी पक्षांचे नेते आहेत, म्हणजे ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांना सीबीआयने कह्यात घेतले. विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.