प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या पार्थिव देहावर श्री क्षेत्र कांदळी (पुणे) येथे अंत्यसंस्कार !

पुणे, १९ सप्टेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी आणि पू. नंदू (हेमंत) कसरेकर यांच्या मातोश्री वात्सल्यमूर्ती प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर, वय ८६ वर्षे) यांनी नाशिक येथे त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी देहत्याग केला. त्यानंतर त्यांचे पार्थिव पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र कांदळी येथे आणण्यात आले होते. श्री क्षेत्र कांदळी येथील स्मशानभूमीत प.पू. जीजी यांच्या पार्थिव देहावर १९ सप्टेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता श्री. रवींद्र कसरेकर (प.पू. जीजी यांचे तृतीय पुत्र) यांनी अग्नीसंस्कार केला.

प.पू. जीजी यांचे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले पार्थिव

या वेळी प.पू. जीजी यांचे मोठे सुपुत्र पू. नंदू कसरेकर, मधले सुपुत्र श्री. सुनील कसरेकर, धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर, मुलगी (श्रीमती) मिनाताई खोडके, जावई श्री. जयंत रामचंद्र पळशीकर (मृत मुलगी कै. (सौ.) नर्मदा यांचे पती), मोठ्या स्नुषा सौ. स्मिता हेमंत कसरेकर, मधल्या स्नुषा सौ. नयना सुनील कसरेकर आणि धाकट्या स्नुषा सौ. नीलिमा रवींद्र कसरेकर, तसेच कु. दीपाली, कु. वैभवी, चि. सोहम्,  कु. रेवा, विपुल आणि विशाल ही नातवंडे उपस्थित होती.

‘ॐ’चा उच्चार करून प.पू. जीजींचा देहत्याग

न्यूमोनिया झाल्यामुळे प.पू. जीजींना नाशिक येथे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी आणण्यात आले होते. १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी २ वाजता अचानक ‘ॐ’चा उच्चार करून त्यांनी देहत्याग केला.

उपस्थित संत आणि मान्यवर

या वेळी ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदौर’चे विश्वस्त श्री. रवींद्र दत्तात्रय कर्पे, ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र भवरासकर, डोंबिवली येथील प.पू. गोखले महाराज, डॉ. (सौ.) कुंदाताई जयंत आठवले, नारायणगाव येथील प.पू. शशिकांत ठुसे, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. अशोक काशिनाथ भांड हे उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. प.पू. जीजींच्या पार्थिव देहाच्या दर्शनासाठी शेकडो भक्त श्री क्षेत्र कांदळी येथे आले होते. कांदळी येथे मध्यरात्रीपासून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा कार्यक्रम चालू होता.

२. प.पू. जीजींचे पार्थिव उचलतांना ‘हरि ॐ तत्सत् ।’ असा नामजप करण्यात आला.

३. अंत्यसंस्कार झाल्यानंतर वातावरणात शांतता आणि चैतन्य जाणवत होते.