सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा ठेवून दुर्धर रोगांनाही निर्भयतेने सामोरे जाणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक कठीण प्रसंगांतून जावे लागले. सर्वसाधारण व्यक्ती अशा प्रसंगांत मनाने कधीच खचून गेली असती; पण घरातील धार्मिक वातावरण आणि बालपणापासून देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे ते निर्भयतेने या प्रसंगांना सामोरे गेले. देवाने त्यांच्यावर भरभरून केलेल्या कृपेच्या जाणिवेमुळे त्यांच्या मनात देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता होती. वर्ष १९९७ मध्ये ते साधनेत आले. मनाचा प्रांजळपणा, साधनेतील चिकाटी, शिकण्याची वृत्ती, स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांसाठी केलेले प्रयत्न आणि गुरूंवरील अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन ३.६.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. ‘गुरुकृपेने तीव्र प्रारब्धही न्यून होते’, याचीही त्यांनी अनुभूती घेतली. ‘गुरुकृपा होण्यासाठी सातत्याने साधनारत राहून चिकाटीने कसे प्रयत्न करायचे ?’, याचा वस्तूपाठच त्यांनी त्यांच्या जीवनपटातून साधकांसमोर ठेवला आहे. त्यांचा हा साधनाप्रवास साधकांना साधनेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. मागील भागात आपण त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण आणि नोकरी हा भाग पाहिला. आता या भागात ‘त्यांच्यावर आलेली दुर्धर संकटे, देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावर त्यांचे संकटांना निर्भयतेने सामोरे जाणे, वकिली व्यवसायाला केलेला आरंभ आणि त्यांचे कौटुंबिक जीवन’, याविषयी पहाणार आहोत.

(भाग २)

भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/612205.html

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

७. गळ्यावरील गाठीचे झालेले शस्त्रकर्म !

७ अ. विधीचे (कायद्याचे) शिक्षण घेतांना गळ्यावर आलेल्या गाठीचे शस्त्रकर्म करावे लागणे : ‘वर्ष १९८२ मध्ये मी विधीचे पदवी शिक्षण घेत असतांना, म्हणजे वयाच्या २१ वर्षी माझ्या गळ्यावर ‘थायरॉईड’च्या बाजूला गाठ आली. आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार शस्त्रकर्म करायचे ठरले. तेव्हा संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या मानाने सर्व सुविधा बर्‍यापैकी असल्याने तेथे शस्त्रकर्म करण्याचे ठरले. देवाच्या कृपेने मराठवाड्यातले नाक, कान आणि घसा तज्ञ अन् सर्वांत ज्येष्ठ आधुनिक वैद्य रेगे यांनी माझे शस्त्रकर्म केले.

७ आ. शस्त्रकर्म करतांना गळ्याजवळील गाठ आतून पुष्कळ मोठी असल्याचा अंदाज न आल्याने शस्त्रकर्म थांबवावे लागणे आणि दोन दिवसांनी पुन्हा शस्त्रकर्म केल्यावर ते यशस्वी होणे : माझ्या गळ्याजवळील गाठ काढण्यासाठी तज्ञांनी गळ्याला छेद दिला; पण ती गाठ आतून फार मोठी होती. याचा अंदाज न आल्याने शस्त्रकर्म थांबवावे लागले. गळ्याला दिलेला छेद शिवून नंतर पुन्हा २ दिवसांनी शस्त्रकर्म करायचे ठरले. त्यामुळे २ दिवसांनंतर मला पुन्हा नव्या शस्त्रकर्माला सामोरे जावे लागले; मात्र ते शस्त्रकर्म यशस्वी झाले आणि मी बरा होऊन घरी आलो. त्यांनी मला ७ दिवसांनंतर गाठीचा अहवाल घेण्यासाठी बोलवले होते; परंतु मी अहवाल आणायला गेलो नाही.

७ इ. देवाच्या, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच या शस्त्रकर्माच्या वेळी काहीही त्रास न होणे : माझा देवावर दृढ विश्वास होता. रुग्णालयात असतांना २ दिवसांच्या अंतराने २ शस्त्रकर्मे होऊनही देवाने मला काहीही त्रास जाणवू दिला नाही. ‘प्रत्येक वेळी भगवंत (म्हणजे माझ्या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर आठवले) माझ्या समवेतच असून तो माझे रक्षण करत आहे’, याची मला पदोपदी प्रचीतीच मिळत होती.

८. वकिली व्यवसायाला आरंभ

८ अ. संभाजीनगर येथील ज्येष्ठ अधिवक्ता नरेंद्र चपळगावकर यांच्याकडे वकिली व्यवसाय करण्यास आरंभ करणे : माझे विधीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी आरंभी ३ वर्षे नोकरी केली. नंतर वर्ष १९८४ पासून मी अधिवक्ता नरेंद्र चपळगावकर यांच्याकडे वकिली करण्यास आरंभ केला. अधिवक्ता नरेंद्र चपळगावकर हे पू. (अधिवक्ता) सुधाकर चपळगावकर (सनातनचे ९७ वे संत, वय ७७ वर्षे) यांचे मोठे भाऊ आहेत. नंतर वर्ष १९९६ मध्ये माझा पू. (अधिवक्ता) सुधाकर चपळगावकर यांच्याशी म्हणजे पू. बाळासाहेबांशी परिचय झाला.

८ अ १. अधिवक्ता नरेंद्र चपळगावकर यांचा थोडक्यात परिचय ! : माझे वरिष्ठ (‘सिनिअर’) म्हणजे अधिवक्ता नरेंद्र चपळगावकर साहित्यिक, उत्तम वक्ता आणि नावाजलेले वकील होते. त्यांचे वागणे मला ऋषितुल्यच वाटत होते. त्यांची देवावर श्रद्धा होती; मात्र त्यांनी कधीही कर्मकांड केले नव्हते. ‘ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होणार’, अशीच त्या वेळी त्यांच्याविषयी चर्चा होती; मात्र वर्ष १९७२ नंतर इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत त्यांना तेव्हा ‘न्यायमूर्ती’चे पद न मिळता वर्ष १९९० मध्ये मिळाले.

८ आ. अधिवक्ता नरेंद्र चपळगावकर यांनी ‘वकिली व्यवसाय करतांना ‘प्रत्येक मासाला ठराविक रक्कम मिळेल’, अशी अपेक्षा ठेवू नकोस’, असे सांगणे : अधिवक्ता नरेंद्र चपळगावकर यांनी मला सांगितले, ‘‘नोकरीत मिळते, तशी येथे तुला प्रत्येक मासाला ठराविक रक्कम मिळेल, अशी तू अपेक्षा ठेवू नकोस.’’ त्यांच्याकडे ५ – ६ कनिष्ठ (ज्युनियर) वकील होते. ते त्या प्रत्येकाला थोडे थोडे आणि समान पैसे (वेतन) देत असत. त्यांच्याकडे तेव्हा आणि नंतरही ५ – ६ अधिवक्ते शिकायला असायचे.

९. विवाह आणि कौटुंबिक जीवन

९ अ. पत्नी पापभिरू आणि सरळमार्गी असून ती अन् दोन्ही मुलीही अनुग्रहित असणे : ४ वर्षे वकिलीचा व्यवसाय केल्यानंतर वर्ष १९८८ मध्ये माझे लग्न झाले. माझी पत्नी सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी (वय ६३ वर्षे) पापभिरू, अनुग्रहित आणि भक्तीमार्गी आहे. वर्ष १९९३ मध्ये मला पहिले कन्यारत्न (कु. रेणुका सुरेश कुलकर्णी) झाले. ती अभियंता आहे. वर्ष १९९७ मध्ये मला दुसरी मुलगी (आधुनिक वैद्या (कु.) राधिका सुरेश कुलकर्णी) झाली. ती आधुनिक वैद्य आहे. माझी पत्नी आणि दोन्ही मुली प.पू. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प.पू. प्रल्हाद महाराज यांच्या अनुग्रहित (अनुग्रह दिलेल्या) आहेत.

९ आ. मुलीला झालेला त्रास : वर्ष १९९७ मध्ये माझ्या धाकट्या मुलीला लघवीतून प्रथिने जायची; म्हणून तिच्यावरील उपचारांसाठी मला आणि माझ्या पत्नीला २ – ३ मास मुंबईत बालरुग्णालयात रहावे लागले. तो मोठा कठीण प्रसंग होता; परंतु देवाच्या कृपेने हे संकटही कायमचे दूर झाले. मुलगी ठणठणीत बरी झाली.

९ इ. देवाच्या कृपेने वाईट सवयी सुटणे : मी देवाला पुष्कळ मानायचो, तरीही माझी वागणूक वाईट होती. मला ‘अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान करणे’, अशा वाईट सवयी लागल्या होत्या. हे सर्व प्रकार माझी आई किंवा पत्नी यांना आवडत नव्हते. त्या दोघीही मला नेहमी सांगायच्या, ‘‘अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान सोडा’; परंतु माझ्या हट्टापुढे त्यांचे काही चालत नव्हते. वर्ष २००० मध्ये देवाच्या कृपेनेच मी अभक्ष्य भक्षण सोडले आणि वर्ष २००२ मध्ये अपेयपान सोडले.

१०. कर्करोग झाल्याचे निदान होऊन पुन्हा दोन शस्त्रकर्मे होणे

१० अ. वर्ष १९९६ मध्ये गळ्यावर पुन्हा गाठ येणे : वर्ष १९८२ च्या शस्त्रकर्मांनंतर वर्ष १९९६ मध्ये पुन्हा साधारणत: १४ वर्षांनंतर माझ्या गळ्यापाशी पुन्हा एक मोठी गाठ निर्माण झाली. आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार ती गाठ काढण्यासाठी ‘डॉक्टर हेडगेवार रुग्णालया’त शस्त्रकर्म करावे लागले. आधुनिक वैद्यांच्या आणि आमच्या दृष्टीने हे शस्त्रकर्म यशस्वी झाले होते. गाठ पूर्णतः काढली होती. मला ७ दिवसांनी अहवाल घ्यायला बोलावले होते; परंतु मी गेलो नव्हतो. वर्ष १९८२ मध्ये झालेल्या माझ्या पहिल्या शस्त्रकर्माचा अहवालही मी डॉक्टरांकडून आणला नव्हता आणि आताही आणला नाही. खरेतर, दुसर्‍यांदा तीच चूक करणे, किती वाईट असते ? पण मी अशा चुका करत गेलो.

१० आ. नातेवाइकांनी अहवाल आणणे आणि त्यात ‘गळ्यात अजूनही कर्करोगाच्या गाठी आहेत’, असे निदान होणे : देव दयाळू असल्याने तो मला वाचवत होता. माझ्या नातेवाइकांनी परस्पर अहवाल आणला. त्यात त्या गाठीजवळचा आणि काढून टाकलेला भाग कर्करोगाने बाधित झालेला होता. कर्करोग ‘मॅलिग्नन्ट (malignant)’ म्हणजे बिकट अवस्थेत पोचला आहे’, असे अनुमान झाले. मला मुंबईला ‘टाटा मेमोरियल रुग्णालया’त पाठवण्यात आले. तपासणीनंतर आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘शस्त्रकर्म नीट झाले नाही. अजूनही गळ्यात कर्करोगबाधित गाठी आहेत. त्या पुष्कळ बारीक असून त्यात कर्करोग पसरलेला आहे; म्हणून अजून एक शस्त्रकर्म मुंबईत आमच्या रुग्णालयात करा किंवा आम्ही सांगू त्या संभाजीनगरच्या दुसर्‍या रुग्णालयात करा.’’ मी माझे दोन भाऊ (श्री. दिनेश कुलकर्णी आणि श्री. राजेश कुलकर्णी) आणि मेहुणे (श्री. उदय भाकरे) यांच्याशी चर्चा करून संभाजीनगरला शस्त्रकर्म करण्याचे ठरवले आणि ‘कमलनयन बजाज’ या रुग्णालयात माझे दुसरे शस्त्रकर्म करण्यात आले. अशा प्रकारे १४ वर्षांत मला दोनदा कर्करोग झाला आणि प्रत्येक वेळी २ शस्त्रकर्मे झाली.

१० इ. स्वतःच घरातील कर्ता पुरुष असल्यामुळे ही गोष्ट आई, पत्नी आणि ४ भावंडे यांच्यापासून लपवून ठेवणे : ईश्वर मला सकारात्मक ठेवून माझे प्रारब्ध किंवा कर्मभोग भोगायला साहाय्य करत होता. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला भीती वाटत नव्हती; पण मी ही गोष्ट माझी पत्नी, आई आणि ६ पैकी ४ भावंडे यांच्यापासून लपवून ठेवली; कारण मीच कर्ता किंवा कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती होतो. ते माझ्यावर अवलंबून होते. केवळ दोन भाऊ आणि मेहुणे यांनाच विश्वासात घेऊन मी त्यांना हे सर्व सांगितले.

११. किरणोपचार (रेडिएशन्स) चालू होणे

किरणोपचार पद्धत : किरणोपचार (‘रेडिएशन’) हा एक गंभीर प्रकार असतो. तिथे रुग्णाला पुष्कळ अवघड बंधने आणि पथ्ये पाळावी लागतात. रुग्णावर किरणोपचार करण्यापूर्वी २ – ३ दिवस आधी त्याला भरती करून घेतात. तेथे किरणोपचार घेणारे अनेक आंतररुग्ण (indoor) असतात. त्यांचे डोस घेणे संपल्यावर त्यांना विलगीकरणात (‘आयसोलेशेन’मध्ये ) ३ – ४ दिवस ठेवतात. त्यानंतर त्यांना रुग्णालयातील सामान्य कक्षात २ – ३ दिवस ठेवतात; मात्र रुग्णाला सामान्य कक्षात आणतांना २ वेळा कढत पाण्याने स्नान घालतात आणि त्याच्या अंगावरचे सर्व कपडे नष्ट करतात.

११ अ. किरणोपचार संपल्यावर घरी न जाता १५ ते २० दिवस बाहेर खोली घेऊन रहावे लागणे : कर्करोगाचे निदान झाल्यावर मला ‘टाटा स्मारक रुग्णालया’मध्ये भरती व्हावे लागले. तिथे मला किरणोपचार (किरणोपचार म्हणजे कर्करोगामध्ये देण्यात येणारे उपचार) घ्यावे लागले. मला घरी सोडतांना आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुम्ही घरी गेल्यावर ७ दिवस विलगीकरणात रहा. गर्भवती स्त्रियांसमोर १५ ते २० दिवस जाऊ नका.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘घरी माझी पत्नी, भावजय आणि एक मेहुणी गर्भवती आहे.’’ तेव्हा आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘तुम्ही १५ ते २० दिवस खोली घेऊन बाहेर रहा.’’

या बंधनांच्या तुलनेत मला वर्ष २०२० मधील कोविड-१९ ची बंधने साधी वाटली. ‘देव माझी सर्व सिद्धता आधीच करून घेत होता’, हे मला आता कळते.

१२. भयंकर अपघात होऊनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यातून वाचणे : वर्ष २००२ मध्ये पावसाळ्याच्या दिवसांत मी आगाशीत उभा असतांना सोलर यंत्र (पाणी गरम करायचे यंत्र) माझ्या अंगावर पडले. यातूनही मी मरता मरता वाचलो. खरेतर तेव्हाही मी सनातन संस्थेचा खर्‍या अर्थाने साधक नसलो, तरी ‘केवळ गुरुमाऊलीनेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) मला वाचवले’, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. अपघातानंतर ज्यांनी आगाशीत जाऊन हे दृश्य बघितले, त्यांना ‘यात सापडलेली व्यक्ती जिवंत असेल’, असे वाटले नव्हते.

मला हे सर्व आयुष्य देवाने, म्हणजे गुरुमाऊलीने दिले आहे. देव माझे प्रारब्ध आणि कर्मभोग संपवत होता. प्रत्येक वेळी संकटातून तोच मला तारत होता. त्यामुळे माझी ईश्वरावरची श्रद्धा अधिक दृढ होऊन पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.’

या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/612387.html

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक