लेखांक ५२
काही वेळा काहींना गळून गेल्यासारखे किंवा शक्तीहीन झाल्यासारखे वाटते. पुरेसा आहार घेऊनसुद्धा काहींना असे होते. जठराग्नी (पचनशक्ती) मंद झाल्याचे हे लक्षण आहे. यावर पुढील क्रमाने प्राथमिक उपचार करावेत.
१. रात्री लंघन (उपवास)
एक दिवस रात्रीचे जेवण करू नये, तसेच काही खाऊ नये. भूक लागल्यास गरम पाणी प्यावे. शरिरात जडपणा जाणवणे, पोट साफ न होणे, घशात कफ साठणे अशी लक्षणे असल्यास पाव चमचा सुंठ चूर्ण अर्धी वाटी कोमट पाण्यात मिसळून प्यावे. हा झाला उपचारांमधील पहिला दिवस.
२. संसर्जन क्रम (क्रमाक्रमाने आहार वाढवणे)
२ अ. सकाळी विलेपी : दुसर्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करावी आणि जेव्हा भूक लागेल, तेव्हा थोडा पातळ भात किंवा मऊ भात २ चमचे तूप आणि चवीपुरते मीठ घालून जेवावा. पातळ भात बनवतांना त्याच्यामध्ये थोडी मुगाची किंवा तुरीची डाळही घालावी. पातळ भाताला संस्कृत भाषेत ‘विलेपी’ म्हणतात. ही विलेपी पचायला हलकी आणि पोटात होणारी जळजळ शमवणारी आहे. सोबत मेतकूट, तसेच चवीपुरते लोणचे घेतल्यास चालते. विलेपीऐवजी मूगडाळीचे वरण किंवा कढण तूप घालून प्यायले, तरी चालते. (‘कढण’ म्हणजे ‘मूगडाळ पाण्यात शिजवून त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेणे.’)
२ आ. दुपारी वरणभात : दुपारी भूक लागल्यावर गरम वरणभात २ चमचे तूप घालून जेवावा.
२ इ. सायंकाळी पचायला हलका आहार : पुढीलपैकी कोणताही एक पदार्थ – तुपामध्ये जिरे, कढीपत्ता आणि हळद यांची फोडणी देऊन बनवलेला लाह्यांचा चिवडा, तसेच याचप्रमाणे बनवलेला भाजलेले पोहे किंवा चुरमुरे यांचा चिवडा, राजगिरा लाडू किंवा कणकेचा लाडू, डाळिंब, पपई, सफरचंद, मोसंबी, संत्रे यांपैकी एखादे फळ (भूक शमेल एवढ्या प्रमाणात)
२ ई. रात्री नेहमीचे जेवण : हे जास्त तिखट नसावे.
३. नियमित व्यायाम आणि उन्हाचे उपाय
तिसर्या दिवसापासून प्रतिदिन न्यूनतम ३० मिनिटे व्यायाम करावा. यामध्ये स्वतःच्या क्षमतेनुसार चालणे; धावणे; सर्व सांध्यांच्या हालचाली होतील, असे व्यायाम; उभ्याने, बसून, पाठीवर, तसेच पोटावर झोपून करण्याची योगासने आणि प्राणायाम या सर्वांचा समावेश असावा. शक्य झाल्यास सकाळच्या किंवा सायंकाळच्या उन्हात व्यायाम करावा. फार कडक ऊन अंगावर घेऊ नये. दिवसभरात न्यूनतम ३० मिनिटे तरी उन्हाचे उपाय करावेत. (अंगावर ऊन घ्यावे.)
४. आवश्यकतेनुसार अधेमधे लंघन इत्यादी क्रम पुन्हा आचरणे
वरीलप्रमाणे कृती केल्यास ‘शरिरातील आमदोषाचे पचन होते (अन्नपचन नीट न झाल्याने शरिरात निर्माण झालेली विषारी द्रव्ये नष्ट होण्यास साहाय्य होते)’ आणि ‘जठराग्नी प्रदीप्त होतो (पचनशक्ती सुधारते)’. लंघन आणि संसर्जन हा उपचार प्रत्येकी १ दिवस आवश्यकतेनुसार १ – २ मासांनी पुन्हा करावा. व्यायाम आणि उन्हाचे उपाय यांमध्ये सातत्य ठेवावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२२)
सनातनची आयुर्वेदिक औषधे
१. पहिल्या दिवशी रात्री लंघन करतांना लक्षणांनुसार सुंठ चूर्ण घेण्यासाठी ‘सनातन शुण्ठी (सुंठ) चूर्ण’ उपलब्ध आहे.
२. प्रमाणासाठी चहाचा चमचा वापरावा.
३. वरील प्राथमिक उपचार करून गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.