कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील बनासकांठा येथे अलीकडेच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार शशिकांत पंड्या यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. इतर अनेक हिंदु संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला. या मोर्च्यामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक सहभागी झाले होते. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. हा मोर्चा हिरा बाजार येथे पोचल्यावर लोक अनियंत्रित झाले. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, असे एका वृत्तात म्हटले आहे.
बनासकांठा जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण नुकतेच समोर आले होते. एका मुसलमान मुलाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदु मुलीने तिच्या भावाचे आणि आईचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी दोन आरोपींना अटकही केली होती. या घटनेचा लोकांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला.