बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली दृढ श्रद्धा !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्ष २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे या प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. गुरुकृपेने त्या यातून बर्‍या झाल्या. त्या रुग्णाईत असतांना सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांना सौ. सुमन दत्तात्रेय दुसे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.

पू. अशोक पात्रीकर

१. ‘दुखण्याच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले माझे प्रारब्ध नष्ट करत आहेत’, या दृढ श्रद्धेने स्थिर राहून नामजप करणार्‍या सौ. दुसेकाकू !

‘सौ. सुमन दत्तात्रेय दुसेकाकू गंभीर रुग्णाईत असतांना श्री. किरण दुसे (सौ. दुसेकाकूंचा मुलगा) मला अधूनमधून ‘व्हिडिओ कॉल’ लावून काकूंशी बोलायला सांगायचा. काकूंना धीर देण्यासाठी मी त्यांना सांगत असे, ‘‘काकू, तुम्हाला काही झाले नाही. परात्पर गुरु डॉक्टर तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहेत. तुम्ही अधिकाधिक नामजप करत रहा.’’ तेव्हा काकू मला म्हणायच्या, ‘‘या दुखण्याच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर माझे प्रारब्ध जाळत आहेत. मी स्थिर आहे आणि नामजप करत आहे.’’

सौ. सुमन दुसे

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मृत्यूच्या दारातून परत आणल्याबद्दल सौ. दुसेकाकूंना अतीव कृतज्ञता वाटणे आणि त्या स्थिर अन् हसतमुख असणे

दुसेकाकूंची प्रकृती बरी झाल्यावर त्या नागपूरहून बडनेरा येथे परत जाण्याआधी मला म्हणाल्या, ‘‘पहा, मला परात्पर गुरु डॉक्टरांनी मृत्यूच्या दारातून परत आणले. त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’’

या दोन्ही प्रसंगांत मला काकूंच्या चेहर्‍यावर काळजीचा लवलेशही जाणवला नाही. त्या स्मित हास्य करून बोलत होत्या. काकू बडनेरला त्यांच्या घरी परत आल्यानंतर मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ‘त्या एवढ्या मोठ्या दुखण्यातून बर्‍या झाल्या आहेत’, असे मला जाणवले नाही. काकूंच्या चेहर्‍यावर मला नेहमीप्रमाणेच हास्य जाणवले.

‘दुसेकाकूंच्या माध्यमातून मलाही गुरुमाऊलीची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा अनुभवता आली’, याबद्दल मी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘गुरुमाऊली प्रत्येक साधकाची अशी काळजी घेते’, असे अनेक रुग्णाईत साधकांकडून ऐकतांना माझा भाव जागृत होतो. धन्य ती गुरुमाऊली !’

– (पू.) अशोक पात्रीकर, अमरावती (१२.४.२०२२)


आई, गुरुदेवांना आठवण्यास शिकवले तू आम्हांस ।

कु. माधुरी दुसे

लहानाचे मोठे करूनी, संस्कार केले चांगुलपणाचे ।
आठवूनी देवास, समाधानी रहाण्यास शिकवले ।। १ ।।

लहानपणापासून भोगलेस तू प्रारब्ध, जाणीव होऊ न दिली ।
‘प्रत्येक गोष्टीत देवाने चांगले केले’, याची आठवण करून दिली ।। २ ।।

व्यवहारातून साधनेकडे वळवले तू आम्हांस ।
गुरुदेवांना आठवण्यास शिकवले तू आम्हांस ।। ३ ।।

शिकविले तू आम्हास आम्ही केवळ ‘या जन्माचे माता-पिता’।
गुरुदेव सर्वांचे ‘जन्मोजन्मीचे माता-पिता’ ।। ४ ।।

– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२२)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक