सोलापूर, ४ सप्टेंबर (वार्ता.) – पारंपरिक युद्धापेक्षा हायब्रीड युद्ध महाभयानक असते. या युद्धात शस्त्रांचा वापर होत नाही. कोरोनाचा संसर्ग म्हणजे ‘चीनी व्हायरस’ हा हायब्रीड युद्धाचाच एक भाग आहे. चीनने जैविक महायुद्ध पुकारले असून कोरोना हा त्याचाच एक भाग आहे. जैविक युद्धाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे. यात सर्वसामान्य नागरिकांनी सैनिकाची भूमिका बजावावी. चिनी बनावटीचे साहित्य खरेदी करू नये. स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला आणखीन बलवान बनवा, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.
‘उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम्.आय.डी.सी.’ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित बौद्धीक व्याख्यानमालेचे १ सप्टेंबर या दिवशी निर्मलकुमार फडकुले सभागृहात उद्घाटन करण्यात आले. ‘तैवान युक्रेन युद्ध, चीनच्या भारताविरुद्ध हायब्रीड युद्धाला भारताचे प्रत्युत्तर’ या विषयावर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. या व्याख्यानमालेचे यंदा ५७ वे वर्ष आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विठ्ठल वंगा यांनी केले.