हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोर (पुणे) प्रशासनास श्री गणेशमूर्तीची विटंबना थांबवण्याविषयी निवेदन !

निवेदन स्वीकारतांना नायब तहसीलदार मनोहर पाटील आणि देतांना व्यसनमुक्ती युवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु जनजागृती समितीचे यांचे कार्यकर्ते

भोर (पुणे) – गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवून श्री गणेशमूर्तीची घोर विटंबना थांबवण्याविषयी, तसेच ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देऊ नये याविषयी, तसेच त्यांची विक्री आणि विसर्जन यावर बंदी घालण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोरचे नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी ‘हा चांगला उपक्रम आहे’, असे सांगितले. शासनानेही शाडू मातीची श्री गणेशमूर्ती असावी याविषयी सांगितलेच आहे आणि या संदर्भात असलेला शासन आदेश त्यांनी दाखवला. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळ, मंडप, सजावट आणि मिरवणूक यांविषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचना असलेली प्रतही त्यांनी काढून दिली. ‘या काळात कुठे काही त्रुटी दिसत असतील किंवा काही चुकीचे वाटत असेल, तर आपण प्रशासन आणि पोलीस यांच्या निदर्शनास आणून द्या. त्याविषयी आम्ही नक्कीच कार्यवाही करू’, असे आश्वासन दिले.

या वेळी व्यसनमुक्ती युवक संघाचे पांडुरंग पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रोहित देशमाने आणि हिंदु जनजागृति समितीचे श्री विश्वजीत चव्हाण, श्री. अशोक बारीक उपस्थित होते.