सर्वच देवता भक्तांच्या हाकेला धावून येतात; परंतु श्री गणेशाचे एक नावच ‘विघ्नहर्ता’ असे आहे; म्हणूनच कि काय संकटकाळी ‘गणपति पाण्यात ठेवून’ बसतात. ‘विघ्नेश’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ.
विघ्नेश : विघ्न + ईश = विघ्नेश. ‘विघ्न’ हा शब्द ‘विशेषेण घ्नन्तीति विघ्नानि ।’ (जी विशेषकरून हिंसा करतात, त्रास देतात, ती विघ्ने होत.) असा झाला आहे. विघ्नांचा, संकटांचा ईश, म्हणजे त्यांचे नियमन करणारा, नाश करणारा, तो विघ्नेश. विघ्न म्हणजे ३६० (रज-तम) आणि १०८ (सत्त्व) लहरींनी वेढले जाणे होय. त्रिगुणातीत होण्याच्या ध्येयाच्या हे विरुद्ध होते. ‘ईश’ हा शब्द ‘ई + श’ असा बनला आहे. ‘ई-ईक्षते’ म्हणजे पहाणे आणि ‘श-शमयते’ म्हणजे शांत करणे; म्हणून ईश म्हणजे या ३६० आणि १०८ लहरींकडे लक्ष देऊन त्यांची तप्तता नाहीशी करणारा, त्यांना नष्ट करणारा होय.
‘विघ्नहर्ता’ असेही गणपतीचे एक नाव आहे. श्री गणपति हा विघ्नहर्ता असल्याने कोणत्याही धार्मिक मंगलविधीपूर्वी श्री गणेशपूजन केले जाते.
(संदर्भ – सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणपति’)