टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक

आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – भाग्यनगर पोलिसांनी येथील भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक केली. जुन्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी त्यांना महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले होते. यानंतर त्यांना २५ ऑगस्ट या दिवशी दुपारी जुन्या प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली.

जर कुणी माझ्या धर्म आणि देश यांच्याविषयी अयोग्य बोलत असेल, तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देईन ! – टी. राजा सिंह

या अटकेपूर्वी टी. राजा सिंह यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मला आज किंवा उद्या पुन्हा अटक होऊ शकते. मी केवळ इतकेच सांगू इच्छितो की, जर कुणी माझा धर्म आणि देश यांच्याविषयी अयोग्य बोलत असेल, तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देईन; मग त्याची शिक्षा काहीही होवो. हिंदू आता मागे हटणार नाहीत. मी आशा करतो की, या धर्मयुद्धामध्ये प्रत्येक हिंदू नेहमीप्रमाणे मला साथ देईल, जय श्रीराम !