विधीमंडळाच्या कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी ‘वन्दे मातरम्’च्या गायनाची केली होती मागणी
मुंबई, २४ ऑगस्ट (वार्ता.) – ज्यांच्या मागणीमुळे विधीमंडळाच्या कामकाजाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’चे गायन करण्याचा निर्णय पारित करण्यात आला, असे विधीमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानभवनात गौरव करण्यात आला. धोंडगे यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून विविध शाळा-महाविद्यालय चालू करून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी समाजकारण, राजकारण यांसह पत्रकारितेमध्येही काम केले आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, ९ ऑगस्ट १९९० या दिवशी धोंडगे यांनी स्थगन प्रस्तावामध्ये ‘विधीमंडळाचे कामकाज ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने चालू करावे, अशी मागणी केली होती. ही मागणी सभागृहाने मान्यही केली. त्यामुळे आजही महाराष्ट्र विधीमंडळाच्या कामकाजाचा प्रारंभ ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने होतो.