पाटलीपुत्र येथे विद्यार्थ्याने विद्यार्थिनीवर गोळी झाडली : मुलीची प्रकृती गंभीर

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज !

पाटलीपुत्र (बिहार) – येथील सिपारा भागात काजल कुमारी या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर एका विद्यार्थ्याने गोळी झाडली. एक विद्यार्थी या विद्यार्थिनीच्या पाठीमागून तिच्या मानेमध्ये गोळी मारतांनाचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले आहे. ही विद्यार्थिनी गल्लीत जाण्यासाठी वळताच हा विद्यार्थी  झोळीतील पिस्तूल बाहेर काढून तिच्यावर गोळी झाडतो आणि घटनास्थळावरून पलायन करतो, असे यात दिसत आहे. काजल ९ वीची विद्यार्थिनी आहे. ती खासगी शिकवणीतून घरी जात असतांना ही घटना घडली. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गोळी मारणार्‍या तरुणाची ओळख पटली आहे; पण अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

संपादकीय भूमिका

समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे हे द्योतक आहे. युवा पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी धोरणात्मक पावले न उचलणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद !