जम्मू-काश्मीरच्या ७ अवैध वृत्तसंकेतस्थळांवर बंदी !

सरकारविषयी चुकीची माहिती प्रसृत करून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हा प्रशासनाने चुकीची माहिती प्रसृत करणार्‍या ७ वृत्तसंकेतस्थळांवर (‘न्यूज पोर्टल्स’वर) बंदी घातली आहे. प्रशासनाने ‘या वृत्तसंकेतस्थळांकडून चुकीची माहिती प्रसृत करून सरकारची प्रतिमा मलीन केली जात आहे’, असा ठपका ठेवत त्यांच्या प्रसारणावर प्रतिबंध लावला. ही सर्व वृत्तसंकेतस्थळे अवैध आहेत. ‘जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली’, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधित वृत्तसंकेतस्थळांमध्ये ‘यूनायटेड उर्दू न्यूज’, ‘व्हीडी न्यूज’, ‘न्यूज वर्स इंडिया’, ‘करंट न्यूज ऑफ इंडिया’, ‘न्यूज ब्युरो ऑफ इंडिया एन्.बी.आय.’, ‘टुडे न्यूज लाईन’ आदींचा समावेश आहे. रामबनचे उपायुक्त मस्सारतुल इस्लाम म्हणाले की, ही पहिल्या टप्प्याची कारवाई असून पुढील टप्प्यात जी संकेतस्थळे त्यांच्या अनुज्ञप्तीचे प्रशस्तीपत्रक दाखवण्यात अयशस्वी होतील, त्यांच्यावरही बंदीची कारवाई करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

अशा वृत्तसंकेतस्थळांवर केवळ प्रतिबंध नको, तर त्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !