हिंदूंना विरोध करण्याच्या एकमेव कारणातून मुसलमान समाज आणि मुसलमान समाजातील काही नेते ‘वन्दे मातरम्’ला विरोध करत आहेत ! – हिंदू महासंघ

सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणावे’, या विधानाचे पडसाद

आनंद दवे

पुणे – कलम ३७० असेल किंवा रामजन्मभूमीचा निकाल असेल किंवा आणखी काही असेल, जे-जे हिंदूंना हवे आहे, त्याला विरोध करण्याच्या एकमेव कारणातून मुसलमान समाज आणि मुसलमान समाजातील काही नेते ‘वन्दे मातरम्’ला विरोध करत आहेत. त्यामुळे आमची अशी भूमिका आहे की, अखंड भारत जेव्हा करायचा आहे, तेव्हा करा; पण त्याआधी ‘जन-गण-मन’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीत घोषित करा. ‘वन्दे मातरम्’ हे सर्व शाळांमध्ये आणि सरकारी कार्यालयात म्हणणे अनिवार्य करावे, हा हिंदुस्थान आहे आणि हिंदूंचाच आहे. हे नेहमी-नेहमी का दाखवून द्यावे लागते ? ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याला काही नेत्यांनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलतांना हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आनंद दवे पुढे म्हणाले की, हिंदू महासंघ म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की, त्यांनी ‘वन्दे मातरम्’ म्हटल्याने त्यांची काहीही हानी होत नाही. त्यांच्या भावनासुद्धा दुखावल्या जात नाहीत. हिंदूंच्या दृष्टीने जिथे-जिथे अनुकूल घडते, तिथे विरोध करण्याची गेल्या सहस्रो वर्षांची परंपरा आहे. हे त्याचे एक नवीन उदाहरण आहे. अनेक लोकांनी ‘वन्दे मातरम्’ म्हटले आहे. अनेकांनी ‘वन्दे मातरम्’ म्हणत लढा दिला आहे. सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी भ्रमणभाषवरून संवाद साधतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणावे, असे विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.