पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

मुंबई – पंढरपुरात हिंदु भाविकांना त्रास दिला जात आहे. सरकारने हिंदूंची मंदिरे हडप केली आहेत. ही मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी मी स्वतः पंढरपुरात जाऊन लोकांना भेटणार आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. मुंबईत इस्कॉन मंदिरात वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष विठ्ठल महाराज चौरे, देवव्रत राणा महाराज वास्कर, ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज आणि माऊली संघाचे अध्यक्ष गोसावी महाराज यांनी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी ‘डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना आम्ही पंढरपूर येथे येण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे’, असे देवव्रत राणा महाराज वास्कर यांनी सांगितले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची वार्षिक उलाढाल ३५ कोटी रुपयांच्या आसपास असून वर्षभरात दीड कोटी भाविक दर्शनासाठी येतात. सध्या देवस्थान समितीचे अध्यक्षपद रिक्त असून सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्‍वर महाराज (औसेकर) यांच्याकडे आहे.

संपादकीय भूमिका

मंदिर सरकारीकरणामुळे मंदिराच्या व्यवस्थानाचा गैरकारभार समोर येण्याच्या असंख्य घटना पुढे आल्या आहेत. मंदिरांतील देवनिधीचा वापर हिंदु धर्मकार्यासाठी होणे आवश्यक असल्याने लवकरात लवकर मंदिरे भक्तांच्या कह्यात दिली जावीत, अशी भाविकांची अपेक्षा आहे !