विद्यापिठातील प्रश्नपत्रिका काढतांना चुका करणार्‍या प्राध्यापकांवर कारवाई !

सोलापूर – येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठाच्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका सिद्ध करतांना करतांना प्राध्यापकांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे पुष्कळ चुका झाल्या आहेत. त्यामुळे ५ ऑगस्ट या दिवशी परीक्षा विभाग संचालक आणि अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत प्रश्नपत्रिका काढतांना चुका करणार्‍या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. ‘विद्यापिठाच्या अधिनियमानुसार चुका करणार्‍या प्राध्यापकांवर कडक कारवाई होणार आहे’, असे त्या म्हणाल्या. (प्रश्नपत्रिकांत चुका करणारे प्राध्यापक मुलांना काय शिकवत असतील ! विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी टाळण्यासाठी अशा प्राध्यापकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)


उर्दू प्रश्नपत्रिकेतीलचुकांसाठी प्राध्यापकावर दंडात्मक कारवाई !

विद्यापीठाच्या एम्.ए. अभ्यासक्रमाच्या उर्दू परीक्षेची प्रश्नपत्रिका हस्तलिखित स्वरूपात, तसेच प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तराच्या खुणा असलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे संबंधित प्राध्यापकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यासमवेतच विद्यापिठाच्या परीक्षा कामकाजातूनही त्यांना काढून टाकण्यात आले आहे.

परीक्षेतील चुकांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाही ! – डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु

परीक्षेतील चुकांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाही. यातून मार्ग काढून विद्यार्थ्यांची कोणतीही हानी होऊ नये, याची आम्ही दक्षता घेत आहोत.