कराड जनता सहकारी बँकेच्या कर्मचार्‍यांच्या कर्जाची चौकशी करा !

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – कराड येथील ‘कराड जनता सहकारी बँके’च्या व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी चालू आहे. आता बँकेच्या कर्मचार्‍यांना दिलेल्या कर्जाचीही पोलीस चौकशी करणार आहेत. ६ वर्षांपूर्वी २९६ कर्मचार्‍यांना ४ कोटी ५३ लाख रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली होती. ती चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याचा कर्मचार्‍यांचा आरोप आहे. त्याविषयी कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यासह न्यायालयातही धाव घेतली होती. या कर्जाची चौकशी करावी, असे आदेश सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

अन्वेषणासाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर्. पाटील यांची नेमणूक करण्यात आली असून ३ मासांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कराड जनता सहकारी बँकेला २ वर्षांपूर्वी दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे.