मंत्रालयात कामासाठी येणार्‍या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे

मुंबई – केंद्र पुरस्कृत आणि राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा. जनतेचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा. राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणार्‍या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांना दिले. २६ जुलै या दिवशी मंत्रालयात सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरील सूचना केल्या.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची देशात चांगली प्रतिमा आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यशासनाच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन दिले आहे. अन्य केंद्रीय मंत्रीही राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी आपण नाविन्यपूर्ण योजनाही मांडल्या पाहिजेत. केंद्राचा अधिकाधिक निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर करायला हवेत. विशेषत: रेल्वे, महामार्ग यांविषयी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करावा. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, तसेच प्रामाणिक हवे, अशी जनतेची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण करतांना गतीमान आणि गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत.’’

मुख्यमंत्र्यांचे १०० दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन होणार !

लवकरच १०० दिवसांचा कार्यक्रम सिद्ध करण्यात येणार आहे. पूर्वी चालू असलेली लोकहिताची कामेही चालू ठेवण्यात येणार आहेत. प्रशासनावरील ताण न्यून व्हावा, यासाठी रिक्त पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.